कोल्हापूर • प्रतिनिधी
कसबा बावडा येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट विभागाच्यावतीने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने कोल्हापूरचे सुपुत्र व आयटीसी मुंबईचे माजी कुलगुरू पद्मश्री प्रो.जी.डी यादव यांचे उच्चशिक्षणमधील गुणवत्ता वाढ या महत्वपूर्ण विषयावर ऑनलाईन सेमिनार संपन्न झाला.या सेमिनारचा लाभ देश तसेच देशाबाहेरील पाचशेहून जास्त शिक्षक, संशोधक, पदव्युत्तर व पदवीच्या विविध शाखेमधील उपस्थितांनी घेतला.
यावेळी पद्मश्री डॉ.यादव यांनी सध्या उच्च शिक्षणामधील गुणवत्ता वाढविणे कसे गरजेचे आहे हे स्लाईडद्वारे उदाहरणासहित विशद करून सांगितले. याकरता शिक्षक, विद्यार्थी, संस्थेचे व्यवस्थापन तसेच विशेष करून माजी विद्यार्थी, उद्योगविश्व व पालक या घटकांचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले. ज्यावेळी महाविद्यालय स्वायत्त दर्जा मिळवते, त्यावेळी त्या महाविद्यालयावर परिपूर्ण व गुणवत्तापूर्ण विद्यार्थ्याना घडवण्याची जबाबदारी येते आणि ही जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडणारे महाविद्यालय आपल्या शैक्षणिक विकासाबरोबर देशाचीही आर्थिक प्रगती करू शकते. महाविद्यालयांनी फक्त विद्यार्थ्यांनाच नाही तर शिक्षकांचाही उद्योगविश्वाशी सुसंवाद वाढवणे गरजेचे आहे असेही त्यांनी सांगितले. पदवीदरम्यान विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप करणे अत्यंत गरजेचे आहे हेही त्यांनी विशद केले. त्यामुळे महाविद्यालयामध्ये रोजगार संधीही वाढतील असे सांगितले.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्याकडून उद्योगविश्वामधील प्रोजेक्ट, संशोधन करताना त्यावर कशाप्रकारे पेटंट प्रकाशित करता येईल हे बघणे सध्याच्या स्पर्धात्मक युगामध्ये महत्त्वाचे असल्याचेही डॉ.यादव यांनी सांगितले. विद्यापीठ व महाविद्यालयमध्ये संशोधन हे बहुशाखीय असावे तसेच परदेशातील विद्यापीठाशी संलग्न असल्यास त्याचा अधिक फायदा होईल असेही सांगितले. देशाच्या आर्थिक विकासासाठी विद्यापीठ, महाविद्यालय इंजिनची भूमिका पार पाडतात असेही त्यांनी उदाहरणासहित सांगितले.
या ऑनलाइन सेमिनारच्यावेळी सद्यस्थितीमधील शैक्षणिक प्रणालीवर प्रकाशझोत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांनी टाकला. तसेच या सेमिनारचे महत्व व त्या संबंधित प्रस्तावना डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक डॉ. अनिल गुप्ता यांनी केले.
यावेळी वक्त्यांचा परिचय महाविद्यालयाचे अधिष्ठाता-संशोधन व या सेमिनार चे समन्वयक डॉ. अमरसिंह जाधव यांनी केला. या सेमिनारच्या दरम्यान स्वागत, सूत्रसंचालन व आभार प्रा.राधिका धनाल यांनी मानले.
या सेमिनार करता संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील यांचे प्रोत्साहन लाभले. सेमिनारकरिता डॉ. किरण माने, प्रा. सुनील कुंभार, डॉ. महेश शेलार तसेच महाविद्यालयाच्या रिसर्च व डेव्हलपमेंट विभागाने विशेष परिश्रम घेतले.
———————————————– Attachments area