प्रत्येक घटकाच्या योगदानातूनच देश खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर होईल: राज्यपाल

Spread the love

• शिवाजी विद्यापीठाचा ५८वा दीक्षान्त समारंभ उत्साहात
कोल्हापूर • (जिमाका)
       भारताची वाटचाल आणि प्रगती यामध्ये जेव्हा प्रत्येक घटकाचे योगदान लाभेल, तेव्हाच खऱ्या अर्थाने देश सर्वश्रेष्ठ आणि आत्मनिर्भर होईल. त्यादृष्टीने युवा पिढीने योगदान देण्यास सज्ज व्हावे, असे आवाहन महाराष्ट्राचे राज्यपाल तथा शिवाजी विद्यापीठाचे कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.
       येथील शिवाजी विद्यापीठाच्या ५८ व्या दीक्षान्त समारंभाचे अध्यक्ष म्हणून स्नातकांना ऑनलाईन पद्धतीने संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे तथा नवी दिल्ली येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी या संस्थेचे संचालक डॉ. दिनकर एम. साळुंके यांच्यासह शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. डी. टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील, प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे यांच्यासह विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता उपस्थित होते. या ऑनलाईन समारंभात सुमारे ३५०० जण सहभागी झाले.
       राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, सध्या जग विविध समस्यांनी ग्रस्त आहे. त्यावर उपाय योजण्याचे काम युवा पिढीच सक्षमपणे करु शकते. नवोन्मेष, नवविचार आणि दर्जा या बळावर आपल्याला आत्मनिर्भर व्हायचे आहे, ही बाब नवपदवीधर विद्यार्थ्यांनी सदैव लक्षात ठेवावी. पदवीची प्राप्ती ही या नवीन प्रवासाची खरी सुरुवात आहे. त्यामुळे आयुष्यात कोणतेही काम करताना सर्वोत्तमतेचा ध्यास घेऊन करा आणि उच्च ध्येय ठेवून वाटचाल करा. हाती घेतलेले उपक्रम पूर्ण करताना उत्तम दर्जासाठी आग्रही राहावे. जेणेकरुन त्याची फलनिष्पत्तीही उत्तम राहील. विद्यापीठाचे कुलगुरु आणि येथे कार्यरत सर्वांचे काम उत्कृष्टपणे सुरु असल्यामुळे शिवाजी विद्यापीठाची वाटचाल प्रगतीच्या दिशेने होत आहे, असे ते म्हणाले.
      इतिहासात छत्रपती शिवाजी महाराजांचे जसे विशेष स्थान आहे, तसेच स्थान शैक्षणिक क्षेत्रात शिवाजी विद्यापीठाने प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा, अशी अपेक्षा राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी व्यक्त केली. शिवाजी विद्यापीठाचे शैक्षणिक कार्य योग्य दिशेने सुरु असून ते देशातील प्रगतीशील विद्यापीठांपैकी एक म्हणून नावाजलेले आहे. यापुढील काळातही विद्यापीठाने आपली कामगिरी उंचावत अधिकाधिक लौकिक प्राप्त करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
       यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दिनकर साळुंके म्हणाले, नवभारताच्या उभारणीत विद्यार्थ्यांची अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यादृष्टीने आपल्या वैज्ञानिक व तंत्रज्ञानात्मक नवोन्मेषाच्या अभिव्यक्तीमध्ये कालसुसंगत संयुक्तिकता व मूल्य असले पाहिजे, याची दक्षता विद्यार्थ्यांनी घ्यावी, कारण या बाबी जागतिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रभावी आणि शाश्वत उपाय प्रदान करतात.
     डॉ. साळुंके म्हणाले, नवस्नातकांनी आता आयुष्याच्या आणि उच्च शिक्षणाच्या पुढच्या टप्प्यात प्रवेश करत असताना बौद्धिक चपळता वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे जेव्हा एखादी नवीन संधी येते, तेव्हा ती मिळवण्यासाठी तुम्ही सदैव तत्पर राहता आणि तुमच्या स्वतःच्या संधी निर्माण करण्यासाठीही तयार असता. विद्यार्थी म्हणून मिळवलेले शिक्षण आणि ज्ञान यावर आधारित तुमचा स्वतःचा मार्ग तयार केला पाहिजे. तुम्ही ज्याही क्षेत्रात जाल, तेथे प्रामाणिकपणा आणि बांधिलकी या दोन गुणांच्या बळावर सर्वोत्कृष्टतेचा ध्यास घेऊन कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
      यावेळी शिवाजी विद्यापीठाचा वार्षिक अहवाल कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के यांनी सादर केला. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे तांत्रिक अडचणीमुळे सहभागी होवू शकले नसून त्यांनी स्नातकांना शुभेच्छा दिल्याचे कुलगुरु डॉ. शिर्के यांनी सांगितले.
       तत्पूर्वी, कुलगुरु कार्यालयापासून ते राजर्षी शाहू सभागृहापर्यंत दीक्षान्त मिरवणुकीने समारंभास प्रारंभ झाला. परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक जी.आर. पळसे यांनी हाती ज्ञानदंड घेऊन मिरवणुकीचे नेतृत्व केले. मिरवणुकीत कुलगुरु डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरु डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह सर्व विद्याशाखांचे अधिष्ठाता सहभागी झाले. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाच्या विद्यार्थिनींनी पसायदान सादर केले. समारंभाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने करण्यात आला.
      कुलगुरु डॉ. शिर्के यांनी स्वागत केले तर प्र-कुलगुरु डॉ. पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. परीक्षा संचालक श्री. पळसे यांनी दीक्षान्त समारंभात प्रदान करावयाच्या पदव्या, पदविका आणि प्रमाणपत्रांचे वाचन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. तृप्ती करेकट्टी आणि धैर्यशील यादव यांनी केले, तर प्रभारी कुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!