पूररेषेत टाकलेला कचरा हटविण्याबाबत महानगरपालिकेला आदेश द्या: भाजपची मागणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कचरा घोटाळ्यातील विनाप्रक्रिया कचरा कसबा बावड्यातील पूर नियंत्रण रेषेमध्ये असलेल्या शेतात मोठ्या प्रमाणावर टाकला असल्यामुळे पावसाळ्यात हा कचरा पंचगंगा  नदीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढविण्यास कारणीभूत होणार असल्याने हा सर्व कचरा त्वरित उचलण्याबाबत महानगरपालिकेस आदेश द्यावेत, अशी मागणी भाजपाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी जगन्नाथ साळोखे यांच्याकडे केली आहे.
      भारतीय जनता पार्टीने  ६ जानेवारीला वरील प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या फील्ड ऑफिसरनी प्रत्यक्ष जागेवर येऊन पंचनामा करून त्याबाबतचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वरिष्ठ कार्यालयाला पाठवला होता. या पंचनाम्यात सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर विनाप्रक्रीया कचरा टाकला असल्याचा स्पष्ट उल्लेख होता. परंतु अहवाल देण्यास झालेल्या दिरंगाईमुळे भारतीय जनता पार्टीने प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाला टाळा ठोको आंदोलन केले होते व त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेस कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्या नोटीसला आलेल्या उत्तरासहित अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सदस्य सचिवांना पाठवून त्यांच्यामार्फत सुनावणी लावण्यात येईल असे भाजपाला सांगितले होते. या सुनावणीत भाजपच्या शिष्टमंडळास सहभागी करून घ्यावे यासाठीचे पत्र भाजपाने प्रदूषण नियंत्रण मंडळास २५ फेब्रुवारी रोजी दिले होते. परंतु त्यावर अजून कोणतीही कारवाई झालेली नाही. तसेच महानगरपालिकेनेही टाकलेल्या कचर्‍याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
      गेले सहा महिने भारतीय जनता पार्टी या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत असून प्रदूषण नियंत्रण मंडळाने इतक्या गंभीर विषयाबाबत दाखवलेली उदासीनता निषेधार्ह आहे. सबब तातडीने योग्य ती कठोर कारवाई न केल्यास भारतीय जनता पार्टी पुन्हा एकदा उग्र आंदोलन करावे लागेल तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळासहित अन्य सर्व अधिकाऱ्यांविरोधात योग्य त्या न्यायालयात गुन्हा दाखल करावा लागेल असा इशाराही दिला आहे.
      यावेळी माजी नगरसेवक अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे-पाटील, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे उपस्थित होते.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!