कोल्हापूर • प्रतिनिधी
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृतज्ञता पर्व या अनुषंगाने जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद यांच्यामार्फत व कोल्हापूर जिल्हा तालीम संघ व कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या सहकार्याने १६ ते २३ मे या कालावधीत फुटबॉल (वरिष्ठ गटातील पहिले आठ संघ) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा क्रीडाधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर होणार असून १६ मे रोजी सकाळी ७:३० वाजता स्पर्धेचा पहिला सामना तर दुपारी ४ वाजता दुसरा सामना होईल. यावेळी जिल्ह्यातील सर्व मान्यवरच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. स्पर्धा नॉकआऊट पध्दतीने घेतली जाणार आहेत. स्पर्धेतील विजेत्या संघास ७५ हजार रुपये तर उपविजेत्या संघाला ५० हजार रुपये तसेच तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख पारितोषक, प्रमाणपत्र व ट्रॉफी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने देण्यात येणार आहे.
तसेच २० ते २२ मे या कालावधीमध्ये खासबाग मैदान येथे जिल्हास्तर व राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या कुस्ती स्पर्धा आखाडयामध्ये फ्रि स्टाईल कुस्ती गटामधील वजन गट मुले ५७, ६१, ६५, ७०, ७४, ७ ९, ८६, ९२, ९७ अशा ९ वजनी गटामध्ये नॉकऑऊट पध्दतीने स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. स्पर्धेचा दर्जा हा जिल्हास्तर असून स्पर्धा कोल्हापूर जिल्ह्यातील मल्लांसाठीच आहेत. यामधील प्रत्येक गटातील विजेत्यांना रोख रक्कम अनुक्रमे प्रथम क्रमांक ५००० रुपये, व्दितीय ३००० रुपये, तृतीय २००० रुपये व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच खुला गटातील राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धांचे आयोजन याच कालावधीमध्ये करण्यात येणार आहे. या स्पर्धा मुलांसाठी वजनगट ८६ ते १२५ व मुलीसाठी वजनगत ६५ ते ७६ या वजनी गटामधे नॉकआऊट पध्दतीने आयोजन करण्यात आलेले आहे. या स्पर्धेसाठी रोख रक्कम अनुक्रमे प्रथम क्रमांक ७५००० रुपये, व्दितीय ५०००० रुपये, तृतीय २५००० रुपये प्रमाणपत्र व शिल्ड दिले जाणार आहे.
स्पर्धेच्या नांवनोदणीसाठीची अंतिम तारीख १५ मे २०२२ असून कार्यालयाच्या http://kolhapursports.com/krida_sankul_yadi.html या वेबसाईटवर नोंदणी सुरु आहे. तसेच जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे ऑफलाईन नांव नोंदणी करण्यात येत आहे. कुस्तीसंदर्भात अधिक माहितीसाठी राज्य क्रीडा मार्गदर्शक प्रविण कोंढावळे (मो.नं.९८२३७९२८७९) व क्रीडा मार्गदर्शक कृष्णात पाटील (मो.नं.८७८८६६३५२२) यांच्याशी संपर्क साधावा.
——————————————————-