सुनावणीत सहभागी करा: भाजपाचे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षांना पत्र

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कचरा घोटाळाप्रश्नी होणाऱ्या सुनावणीत तक्रारदार म्हणून सहभागी करून घेण्याबाबतचे पत्र शुक्रवारी भाजपाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष व सदस्य सचिवांना पाठविले आहे.
     जानेवारी महिन्यात भाजपाने उघडकीस आणलेल्या कचरा घोटाळ्याबाबत प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेस नोटीस दिली होती. त्या नोटीसीच्या, उपायुक्त रविकांत अडसूळ यांच्या स्वाक्षरीने दिलेल्या उत्तरात या घोटाळ्यावर पांघरूण घालून दोषी अधिकारी आणि ठेकेदाराला वाचवायचा प्रयत्न समोर आला आहे. या उत्तरात घडलेला प्रकार हा कर्मचारी नवीन असल्यामुळे आणि नजरचुकीने झाल्याचे म्हटले आहे. यावर भाजपाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
      प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानगरपालिकेस दिलेल्या नोटीसीचा पुढचा भाग म्हणून नोटीस व महानगरपालिकेचे उत्तर याचा अहवाल प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या विभागीय अधिकाऱ्यांनी मंडळाच्या सदस्य सचिवांना पाठविला असल्याचे भाजपाला समजले. या अहवालानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळ घडलेल्या घटनेची सुनावणी घेते, त्या सुनावणीत तक्रारदार म्हणून सहभागी करून घ्यावे अशा मागणीचे पत्र शुक्रवारी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष आणि सदस्य सचिव यांना भाजपाच्यावतीने पाठविण्यात आले.
      या पत्रावर प्रदीप उलपे, चंद्रकांत घाटगे, अजित ठाणेकर आणि विजयसिंह खाडे पाटील यांच्या सह्या आहेत.
प्रशासकांनी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल एक आठवड्यापूर्वी मागूनही महानगरपालिकेकडून मिळालेला नाही. यावरही भाजपा तीव्र नाराजी व्यक्त करीत असून येत्या दोन दिवसात अहवाल मिळाला नाही तर पुन्हा एकदा भाजपा आक्रमक आंदोलन करेल, असा इशाराही दिला आहे.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!