पाटाकडील – खंडोबा चुरशीची लढत अखेर बरोबरीत!

Spread the love


• झुंजार क्लबचा पोलिस संघावर एकतर्फी विजय
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शेवटच्या क्षणापर्यंत अत्यंत चुरशीने खेळल्या गेलेल्या सामन्यात जादावेळेत ऋषिकेश मेथे-पाटीलने गोल नोंदवून खंडोबा तालीम मंडळ (अ)चा विजय हिरावून घेतला आणि सामना बरोबरीत राखला. पूर्वार्धातील ८व्या मिनिटास पाटाकडील तालीम मंडळ (अ)वर श्रीधर परबने गोल नोंदवून सनसनाटी निर्माण केली होती. वेगवान खेळामुळे प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावणारा सामना बरोबरीत राहिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला. तत्पूर्वी झालेल्या पहिल्या सामन्यात झुंजार क्लबने नावाला साजेशी ‘झुंजार’ खेळी करून कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघावर ५-१असा एकतर्फी विजय मिळवून ३ गुण प्राप्त केले.
      छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषक स्पर्धेत बुधवारी पाटाकडील – खंडोबा सामना चुरशीचा झाला. पाटाकडीलच्या ऋषिकेश मेथे-पाटील आणि खंडोबाकडून श्रीधर परब यांनी केलेल्या जोरदार चढायांनी प्रेक्षकांना श्वास रोखून धरायला लावले. ऋषिकेश मेथे-पाटीलच्या अनेक संधी खंडोबाचा गोलरक्षक आकाश मेस्त्रीने तितक्याच तत्परतेने परतावून लावत संघावरील गोलचे संकट टाळले.
       सामन्यात सुरूवातीपासूनच वेगवान चढाया झाल्या. पाटाकडील (अ)च्या ऋषिकेश मेथे-पाटीलने केलेल्या जोरदार चढाईत गोलची संधी हुकली. त्यानंतर खंडोबा (अ) कडून झालेली चढाई यशस्वी ठरली. गोलक्षेत्रातून बाहेर आलेला चेंडू श्रीधर परबला मिळाला, त्यावर त्याने डी बाहेरून मारलेल्या फटक्यावर चेंडू थेट गोलजाळ्यात शिरला आणि ८व्या मिनिटास आघाडी मिळाली. गोलची परतफेड करण्यासाठी ऋषिकेशसह रूपेश सुर्वे यांनी खूप प्रयत्न केले पण ते अयशस्वी ठरले.
       पूर्वार्धात मिळालेल्या १-० च्या आघाडीमुळे उत्तरार्धात खंडोबाच्या खेळाडूंनी गोलची आघाडी वाढवण्यासाठी शॉर्ट पासिंगचा अवलंब करून गोलक्षेत्र भेदण्याचा केलेला प्रयत्न पाटाकडीलच्या बचावफळीने व गोलरक्षक विशाल नारायणपुरेने फोल ठरवल्या. श्रीधर परबने दोन – तीन सोप्या संधी गमावल्या. संकेत मेढे, कुणाल दळवी, प्रभू पोवार यांच्याही चाली वाया गेल्या.
       पाटाकडीलच्या रूपेश सुर्वे, रोहित देसाई, ऋषिकेश मेथे-पाटील, रोहित पवार यांच्या वेगवान चाली वाया गेल्या. अक्षय मेथे- पाटीलने मारलेल्या फटक्यावर चेंडू गोलपोस्टवरून बाहेर गेला. एकापाठोपाठ एक चढाया व्यर्थ ठरत असताना अखेर जादावेळेत यश आले. अक्षय मेथेने मारलेल्या फ्री किकवर ऋषिकेश मेथेने गोल नोंदवून संघाला १-१ अशी बरोबरी साधून दिली.
               झुंजार क्लबची ‘झुंजार’ खेळी…..
      दुपारच्या सत्रातील पहिल्या सामन्यात पहिला गोल नोंदवूनही कोल्हापूर पोलिस फुटबॉल संघाला पराभवास सामोरे जावे लागले. संकेत वेसनेकर याने पूर्वार्धात १५व्या मिनिटास गोल नोंदवून संघाचे खाते खोलले पण ही आघाडी पोलिस संघाला टिकवून ठेवणे अवघड गेले. एका गोलने पिछाडीवर पडलेल्या झुंजार क्लबने नावाला साजेशी अशी ‘झुंजार’ खेळी केली. त्यांच्या प्रथमेश बाटेने २३ व्या मिनिटास गोल करून १-१अशी बरोबरी साधली. त्यानंतर राजेश बोडेकरने अवघ्या दोनच मिनिटात गोल नोंदवला. लगेचच २९व्या मिनिटास यश मुळीकने गोल नोंदवून संघाची आघाडी ३-१ अशी भक्कम केली. पूर्वार्धातील आघाडीचा फायदा उठवत उत्तरार्धात राजेश बोडेकरने वैयक्तिक दुसरा तर संघाचा चौथा गोल ६१व्या मिनिटास केला. अखेर सामन्यातील जादावेळेत मुळीकने वैयक्तिक दुसरा तर संघासाठी पाचवा गोल नोंदवत संघाला “यश” मिळवून दिले.
        दरम्यान, पोलिस संघाचा खेळाडू प्रदीप भोसले यास सामन्यात दोन यलो कार्ड मिळाल्याने त्याचे रेड कार्ड झाल्याने त्यास मुख्यपंचानी मैदानाबाहेर घालवले.
                            गुरूवारचे सामने……
• दि.१०: पीटीएम (ब) – सम्राटनगर स्पोर्टस
              शिवाजी – बीजीएम स्पोर्टस 
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!