कोल्हापूर • (जिमाका)
कागल शहरातील अत्याधुनिक विविध विकास कामे पाहिल्यानंतर राज्यात कागलच्या विकासाचा पॅटर्नचा बोलबाला झाल्याशिवाय राहणार नाही, असे गौरवोद्गार पालकमंत्री सतेज पाटील यांनी काढले. निमित्त होते कागल येथे शाहू वसाहत परिसरातील वड्डवाडी येथील चौथ्या टप्प्यातील ९० घरकुलांच्या लोकार्पण सोहळ्याचे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते.
ते पुढे म्हणाले, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कागल शहर आणि तालुक्याच्या विकासाकरिता निधी कमी पडू देणार नाही. कागल शहर हे विकास कामांच्या बळावर भविष्यात संपूर्ण राज्यात आपली स्वंतत्र वेगळी ओळख निर्माण करेल, असा आशावाद व्यक्त करुन मंत्री हसन मुश्रीफ हे खऱ्या अर्थाने लेाकाभिमुख नेतृत्व असल्याचे प्रशंसोद्गार त्यांनी काढले.
राज्यातील ५ कोटी कामगारांपैकी सुमारे ४ कोटी २० लाख कामगार असंघटीत असून त्यांच्या उत्कर्षासाठी आपण अखेरपर्यंत कार्यरत राहणार असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, राज्यात लवकरच टॅक्सी, ट्रक, टेम्पो, रिक्षा चालकांसाठी, शेतमजुरांसाठी तसेच यंत्रमागधारक कामगारांसाठी मंडळ स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी दोन्ही मंत्री महोदयांच्या हस्ते प्रतिनिधीक स्वरुपात ५ बांधकाम कामगारांना कीट (साहित्य) वाटप करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा माणिक माळी, मुख्याधिकारी पंडीत पाटील, नाविद मुश्रीफ, प्रताप माने शशिकांत खोत, चंद्रकांत गवळी, विवेक लोटे, आशा माने, प्रकाश पाटील यांच्यासह कागल नगरपरिषदेचे नगरसेवक, नगरसेविका, घरकुल लाभार्थी आणि नागरिक उपस्थित होते.