पवन माळीचा गोल अन् दिलबहार विजयी! 

Spread the love

• फुलेवाडीवर २-१ गोलने मात
कोल्हापूर • प्रतिनिधी
     अंतिम क्षणी पवन माळीने उत्कृष्टरित्या नोंदवलेल्या गोलच्या जोरावर दिलबहार तालीम मंडळने फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळवर २-१ने मात केली. या विजयामुळे तीन गुणांची कमाई करत दिलबहारने स्पर्धेतील आव्हान राखले. सामना १-१ गोल बरोबरीत सुटण्याची शक्यता असतानाच, महत्वपूर्ण गोल नोंदवून संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या पवन माळीला उत्कृष्ट खेळाडूचा बहूमान मिळाला.
      झुंजार क्लब आणि फॉर्म्युला थ्री रेसर कृष्णराज महाडिक यांच्यावतीने आयोजित के.एम. चॅम्पियनशिप फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. सोमवारी दिलबहार आणि फुलेवाडी यांच्यातील सामना चुरशीचा झाला. पूर्वार्धात रोहित मंडलिकने दिलेल्या पासवर मंगेश दिवसेने २१व्या मिनिटास गोल करून फुलेवाडीस आघाडी मिळवून दिली. दिलबहारकडून झालेल्या चढाईत जावेद जमादारने मोठ्या डी बाहेरून डाव्या पायाने मारलेल्या फटक्यावर चेंडू थेट गोलजाळ्यात शिरला. ३४व्या मिनिटास झालेल्या या गोलमुळे सामना १-१ असा बरोबरीत आला.
      पूर्वार्धात दोन्ही संघाकडून गोलच्या सोप्या संधी वाया गेल्या. याचीच पुनरावृत्ती उत्तरार्धात झाली. वेगवान खेळ आणि चढाया – प्रतिचढाया यामुळे सामन्यात चुरस निर्माण झाली. पूर्णवेळेत दिलबहारच्या सनी सनगर, जावेद जमादार, महंमद खुर्शीद, स्वयंम साळोखे तर फुलेवाडीकडून मंगेश दिवसे, तेजस जाधव, चंदन गवळी, निलेश खापरे यांनी गोलच्या काही सोप्या संधी दवडल्या. दोन्ही संघांनी परस्परांच्या बचावफळी भेदणाऱ्या चाली रचल्या पण अंतिम क्षणी कमकुवत व दिशाहीन फटके यामुळे गोलच्या संधी गमावल्या. अखेर पूर्णवेळेत सामना १-१ गोल असा बरोबरीत राहिल असे असतानाच, जादावेळेत झालेल्या चढाईत अनिकेत जाधवने दिलेल्या पासवर पवन माळीने हेडव्दारा गोल नोंदवून दिलबहारला महत्वपूर्ण विजय मिळवून दिला. 
                  सामने दुपारी ४ वाजता….
दि.२६: शिवाजी – फुलेवाडी
दि.२७: बालगोपाल – दिलबहार 
दि.२८: प्रदर्शनीय सामना 
दि.२९: अंतिम सामना

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!