• कागलमध्ये पेट्रोल दरवाढी विरोधात राष्ट्रवादीचे आंदोलन
कोल्हापूर • प्रतिनिधी
गेल्या दीड-दोन महिन्यांपासून पेट्रोल दर सतत वाढत आहेत. आजघडीला पेट्रोल दर लिटरला शंभर रुपयाच्याही पुढे जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी शतकवीर ठरले आहेत. त्यांनी मारलेली पेट्रोल दराची ही सेंचुरी गोरगरिबांचे कंबरडे मोडणारी आहे, असा घणाघात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला.
कागलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्यावतीने पेट्रोल दरवाढीच्या विरोधात आंदोलन झाले. या आंदोलनात मंत्री श्री. मुश्रीफ बोलत होते. ते पुढे म्हणाले, वास्तविक आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाचे दर कमी होत असताना, भारतात मात्र सतत पेट्रोल दरवाढ होत आहे. या दरवाढीमुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोरगरीबांचे कंबरडेच मोडले आहे. केंद्र सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलेले आहे. पेट्रोलसह डिझेल व गॅसच्या दरवाढीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोरगरिबांना महागाईच्या गर्तेत लोटले आहे.
ही तर शेतकऱ्यांची थट्टा…..
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, हाडं गोठवणार्या थंडीतही दिल्लीमध्ये शेतकरी गेल्या ६० ते ६५ दिवसांपासून आंदोलन करीत आहेत. त्यातील ५० ते ६० जणांचा जीव गेले, तरीही मोदींना त्यांची दया येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींना तर त्यांच्याशी संवाद साधायलाही वेळ नाही. उलट शेतकऱ्यांना आंदोलनजीवी म्हणून त्यांची ते थट्टा करीत आहेत. याची किंमत तुम्हाला मोजावीच लागेल.
यावेळी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, माजी उपनगराध्यक्ष प्रवीण काळबर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजय चितारी, दत्ताजीराव देसाई, माजी उपनगराध्यक्ष सतीश घाडगे, गंगाराम शेवडे, नवाज मुश्रीफ, सुधाकर कोरवी, इरफान मुजावर, संग्राम लाड, सागर गुरव, पंकज खलीफ, राजू माने, बबनराव सूर्यवंशी, अजित पाटील, बच्चन कांबळे, निशांत जाधव आदींसह नागरिक उपस्थित होते.