छत्रपती संभाजीराजे यांना पोलंड देशाचा बेणे मेरितो पुरस्कार प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       पोलंड देशाकडून छत्रपती संभाजीराजे यांना बेणे मेरितो पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पोलंड देशाच्या नागरिकांना अथवा पोलंड देशाला सहकार्य केलेल्या इतर देशातील नागरिकांना पोलंड देशाच्या परराष्ट्र मंत्रालयामार्फत हा पुरस्कार प्रदान केला जातो.
       भारत व पोलंड या दोन्ही राष्ट्रांमधील हा ऐतिहासिक बंध पुन्हा जोपासण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी केलेल्या प्रयत्नांचा गौरव करण्यासाठी आणि त्यामाध्यमातून कोल्हापूरच्या जनतेचाही सन्मान करण्यासाठी पोलंडचे परराष्ट्र मंत्री झ्बिग्नीव राऊ यांच्या हस्ते ‘द बेने मेरिटो’ हा सन्मान युवराज संभाजीराजे छत्रपती यांना दिल्ली येथील पोलंड दूतावासात झालेल्या कार्यक्रमात प्रदान करण्यात आला.
       यावेळी मनोगत व्यक्त करताना छत्रपती संभाजीराजे म्हणाले की “ज्यावेळी जग युद्धाने उद्ध्वस्त झाले होते, युरोप उद्ध्वस्त झाला होता आणि भारताचा काही भाग भयंकर दुष्काळाच्या खाईत होता, तेव्हा कोल्हापूरच्या छत्रपतींनी या पोलिश कुटुंबांना मानवतावादी आधारावर दत्तक घेतले. आम्हाला ही भावना स्मारक आणि संग्रहालयाच्या माध्यमातून जिवंत ठेवायची आहे, ज्यामुळे इंडो-पोलिश संबंध अधिक दृढ होतील.”
       दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडच्या ५००० निर्वासित नागरिकांना कोल्हापूरच्या छत्रपती घराण्याने आसरा दिला होता. या नागरिकांसाठी वळीवडे येथे मोठा कॅम्प उभारण्यात आला होता. २०१९ साली या घटनेस ७० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संभाजीराजे छत्रपती यांनी पुढाकार घेऊन या कॅम्पमध्ये राहिलेल्यापैकी हयात असणाऱ्या नागरिकांना व त्यांच्या कुटुंबियांना राज्य अतिथी म्हणून याठिकाणी निमंत्रित करून वळीवडे पोलंड कॅम्पच्या स्मृती जगविण्यासाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
       १४ सप्टेंबर २०१९ रोजी झालेल्या या कार्यक्रमात पोलंडचे उप परराष्ट्रमंत्री मार्सिन प्रझिडाक आणि भारतातील पोलंडचे राजदूत ॲडम बुराकोव्स्की यांच्या हस्ते १९४२ ते १९४९ या काळात येथे वास्तव्य करणाऱ्या या पोलिश कुटुंबांच्या आणि नागरिकांच्या स्मरणार्थ एक स्मृतीस्तंभाचे अनावरण आणि संग्रहालयाची पायाभरणी करण्यात आली होती.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!