कोल्हापूर • प्रतिनिधी
“नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम”, “मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो”, अशा घोषणांनी उद्योग भवन दणाणून सोडत भाजपाने केलेल्या टाळा ठोको आंदोलनामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळ आज हादरून गेले. अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे संतप्त झालेल्या भाजपा कार्यकर्त्यांनी मंडळाच्या कार्यालयास टाळे घालण्याचा प्रयत्न केल्यावर पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना अटक केली.
६ जानेवारी २०२२ रोजी भाजपा कार्यकर्त्यांनी, महानगरपालिकेकडे साठलेला व कुठलीही प्रक्रिया न केलेला कचरा बावडा परिसरातील शेतामध्ये पसरल्याचा प्रकार उघडकीस आणला होता. त्यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यात त्याठिकाणी अशास्त्रीय पद्धतीने व पर्यावरणाची कोणतीही काळजी न घेता कचरा टाकल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर वारंवार पाठपुरावा करूनही गेल्या २१ दिवसात प्रदूषण मंडळाने यावर कोणतीही कारवाई केली नव्हती. त्यामुळे कारवाई न झाल्यास नियंत्रण मंडळाच्या कार्यालयास टाळे ठोकण्याचा इशारा भाजपाने दिला होता.
त्यानुसार गुरुवारी विजय जाधव, अजित ठाणेकर, चंद्रकांत घाटगे, प्रदीप उलपे, विजय खाडे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे पदाधिकारी उद्योग भवनासमोर जमले आणि घोषणा देत प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयाकडे जाऊ लागले. त्यावेळी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या गेटजवळ आडवले, त्यामुळे कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरु केली. “नियंत्रण मंडळ हमारा नाम, प्रदूषण बढाना हमारा काम”, “मॅनेज अधिकाऱ्यांचा धिक्कार असो”, प्रदूषण मंडळाचे करायचे काय, खाली डोके वर पाय”, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो” अशा घोषणा देत उद्योग भवन हादरवून टाकले. त्यानंतर पोलिसांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी आंधळे व उपविभागीय अधिकारी माने यांना कार्यकर्त्यांसमोर पाचारण केले.
“२१ दिवसांपूर्वी प्रकार उघडकीस आणूनही अजून कारवाई का केली नाही ? पाणी प्रदूषणाची नोटीस दोन दिवसांत देता मग कचऱ्याच्या नोटीसीला इतका वेळ का ? महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांशी तुमचे लागेबांधे आहेत का? कचऱ्याचा प्रश्न पाण्याइतकाच महत्वाचा नाही का ? ” अशा संतप्त सवालांनी कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. अधिकारी यातील कोणत्याच प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देऊ शकत नव्हते. त्यामुळे कार्यकर्ते अधिकच संतप्त होत होते. त्यातच उपविभागीय अधिकाऱ्यांनी दि.२४ जानेवारी रोजी महानगरपालिकेस नोटीस पाठवल्याची माहिती दिल्यामुळे, “ही माहिती आंदोलनापूर्वी का दिली नाही? पोलीस यंत्रणेचा वेळ घालवण्यासाठी हे केले काय? आंदोलनाचा इशारा दिल्यानंतरच नोटीस कशी निघाली?” असे प्रश्न विचारत कार्यकर्ते आणखीनच संतप्त झाले व “विभागीय अधिकारी आल्याशिवाय कोणतेच काम होणार नसेल तर हे कार्यालय असून नसल्यासारखे आहे” असे म्हणत कार्यकर्ते कार्यलायाच्या गेटला कुलूप घालण्यासाठी पुढे सरसावले. त्यावेळी पोलीस व कार्यकर्ते यांच्यात जोरदार झटापट झाली. शेवटी पोलिसांनी सर्व कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
कचराप्रश्नी जोवर जवाबदार अधिकारी व महानगरपालिकेवर कारवाई होत नाही तोपर्यंत अशाच स्वरूपाचे तीव्र आंदोलन भाजपा करत राहील, असा इशारा भाजपा कार्यकर्त्यांनी दिला.
याप्रसंगी हेमंत आराध्ये, दिलीप मेत्राणी, अजित सूर्यवंशी, अमर साठे, सुनील पाटील, आशिष कपडेकर, विवेक कुलकर्णी, धीरज पाटील, राजाराम परिट, मनोज साळुंखे, सचिन साळोखे, राजू मोरे, संजय सावंत, आजम जमादार, सुधीर देसाई, सचिन तोडकर, दिलीप बोंद्रे, तानाजी निकम, सौरभ मालंडकर, भरत काळे, सौ. मंगला निप्पानीकर, सुशांत पाटील, मानसिंग पाटील, गिरीष साळोखे, विवेक वोरा यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते