कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूरच्या प्रलंबित रेल्वे मागण्यांसदर्भात खासदार संजय मंडलिक यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतली. सर्वप्रथम कोल्हापूरकरांच्यावतीने रेल्वेमंत्री म्हणून पदभार स्विकारल्याबाबत नाम.अश्विनी वैष्णव यांचे अभिनंदन केले. यावेळी खासदार मंडलिक यांच्यासोबत शिर्डीलोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिवराव लोखंडे हे उपस्थित होते.
यापार्श्वभूमीवर अधिक माहिती देताना खासदार संजय मंडलिक म्हणाले, पश्चिम घाट आणि कोकण दरम्यानच्या क्षेत्राच्या विकासाच्या संभाव्यतेचा विचार करता कोल्हापूर ते वैभववाडी या रेल्वेमार्गाची उभारणी अत्यंत महत्त्वाची असल्याने या रेल्वेमार्गाचे काम बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे. या मार्गास आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन हा मार्ग लवकरात लवकर कार्यान्वीत करावा. कोल्हापूर शहरानजीक गांधीनगर हे व्यापारी केंद्र असून याठिकाणी मुडशिंगी व परिसरातील नागरिकांना यावयाचे झाल्यास राष्ट्रीय महामार्गावरुन फिरुन दहा किमी अंतर पार करुन यावे लागते. याकरीता लोहिया मार्केट येथे बोगदा अथवा नविन तंत्रज्ञान वापरुन रेल्वे गेट बसवावे. रेल्वेला व्यावसायिक फायद्याच्या दृष्टीने कोल्हापूर ते पुणे दरम्यान प्रवाशांची संख्या जास्त असल्याकारणाने कोल्हापूर ते पुणे इंटरसिटी ट्रेन सुरु करुन अस्तित्वातील ट्रेनचा प्रवास योग्य वेळेच्या वेगात व्हावा याकरीता वेगवान गाडीने सुरु करावी. कोल्हापूर हे पर्यटनाच्या दृष्टीने पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख ठिकाण आहे. देशभरातून पर्यटक याठिकाणी पर्यटनासाठी येत असतात. या पर्यटकांना कोल्हापूरात यावयाचे झाल्यास पुणे जंक्शनहून सुरु असणारी पुणे – दिल्ली (दुरंटो एक्सप्रेस) लांब पल्याची गाडी पर्यटक व प्रवाशांच्या सोयीकरीता कोल्हापूरातून सुरु करावी तसेच कोल्हापूर ते अमृतसर ही नव्याने गाडी सुरु व्हावी आदी मागण्यांसदर्भात रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासोबत सकारात्मकरित्या चर्चा केली.
लवकरच यासंदर्भात व्यक्तीगत लक्ष घालत असून कोल्हापूरच्या रेल्वे संदर्भातील मागण्या प्रामुख्याने पुर्ण करु असे आश्वासन रेल्वेमंत्र्यांनी दिल्याचे खासदार मंडलिक यांनी सांगितले