कोल्हापूर • प्रतिनिधी
श्री राजा शिवछत्रपती यांचे अभ्यासपूर्ण सिंहासनाधिष्ठीत चित्राचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते शुक्रवारी न्यू पॅलेस कोल्हापूर येथे झाले. यावेळी इतिहास अभ्यासक राम यादव, चित्रकार युवराज जाधव, अभिजित तिवले, प्रवीण पोवार, दिपक सपाटे हे उपस्थित होते.
राजा शिवछत्रपती यांचे हे चित्र श्री शिवछत्रपती यांच्या विषयीच्या संदर्भ साधनांवरून तयार केले आहे. या चित्रासाठी शिवरायांची समकालीन आठ ते दहा चित्रांचा तसेच छत्रपती घराण्यातील समाधी मंदिरातील राजेंच्या मूर्तीचा संदर्भ, राजघराण्यातील दागिने, कवड्यांची माळ, शिवरायांच्या जगदंबा तलवारीचे, कट्यारीचे, कमरेचा दाब (कमरपट्टा) इत्यादी संदर्भांचा अभ्यास राम यादव यांनी केला. इतिहास अभ्यासक आणि रायगड विकास प्राधिकरण सदस्य राम यादव यांच्या मार्गदर्शनातून हे चित्र साकारले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील गिरगाव येथील युवा चित्रकार युवराज आनंदा जाधव यांनी हे चित्र काढले आहे.
रायगडावर ६ जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा होतो. या शिवराज्याभिषेकासाठी निघणारी कोल्हापूरच्या शिवभक्तांची टिम रायगडाकडे निघणार असताना या चित्राचे पूजन करूनच निघाले. शुक्रवारी दुपारी या सिंहासनाधिष्ठीत श्री राजा शिवछत्रपती चित्राचे अनावरण युवराज्ञी संयोगिताराजे छत्रपती यांच्या हस्ते झाले.