वीजग्राहकांच्या सेवेला व वीजबिल वसुलीला सर्वोच्च प्राधान्य: ऊर्जामंत्री नितीन राऊत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     गेल्या दीड-दोन वर्षांपासून चक्रीवादळ, महापूर, कोरोनाचा प्रादुर्भाव अशा प्रतिकूल परिस्थितीत राज्याच्या वीजक्षेत्राची वाटचाल सुरु आहे. सध्या महावितरण कंपनीसुद्धा मोठ्या आर्थिक संकटात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकी वसुली करणे आवश्यक आहे. त्याबाबत वीजग्राहकांना महावितरणची आर्थिक परिस्थिती समजून सांगावी. सुरळीत वीजपुरवठा व अचूक वीजबिलांसह ग्राहकसेवेला सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तक्रारींचे निवारण योग्य वेळेत झालेच पाहिजे याकडे वरिष्ठांनी विशेष लक्ष द्यावे असे निर्देश त्यांनी दिले.
     महावितरणच्या ‘प्रकाशगड’ या मुख्यालयात शुक्रवारी (दि.१) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, संचालक (संचालन) संजय ताकसांडे, संचालक (वित्त) रवींद्र सावंत, एमएसईबी होल्डींग कंपनीचे सल्लागार उत्तमराव झाल्टे आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सद्यस्थितीत सुरु असलेल्या विविध योजनांची अंमलबजावणी तसेच वीजदेयक व महसूल, वीजहानी, एएमआर मीटर, येत्या कालावधीतील सणासुदीचे दिवस व रब्बी हंगामामध्ये वीजपुरवठ्याचे नियोजन आदींचा आढावा घेण्यात आला. 
     ऊर्जामंत्री ना. डॉ. राऊत म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जनजीवन पूर्वपदावर येत आहे. विजेची मागणी देखील वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्वच भागात वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासोबतच ग्राहकसेवेसाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वोच्च प्राधान्य द्यावे. तसेच शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या अंमलबजावणीला आणखी गती देण्यात यावी, असे निर्देश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिले.
      उच्चदाबासह २० केडब्लूएपेक्षा अधिक वीजभार असलेल्या सर्व वीजजोडण्यांचे मीटर रिडींग हे ॲटोमॅटीक मीटर रिडींग (एएमआर)द्वारे घेण्याची सूचना त्यांनी यावेळी केली. वीजबिलासंबंधीच्या तक्रारी सोडविण्यासाठी नादुरुस्त मीटर बदलून देणे, देयक दुरुस्ती, वीजमीटरची तपासणी आदी प्रक्रिया तत्परतेने करण्यात याव्यात. ग्राहकांना वीजवापराचे अचूक बिल देणे ही महावितरणची जबाबदारी आहे व त्यासाठी स्थानिक कार्यालयांनी दक्ष राहिले पाहिजे. लोकप्रतिनिधी व इतर वरिष्ठांकडून प्राप्त झालेल्या तक्रारींचे ताबडतोब निवारण करून त्यासंबंधीची माहिती त्यांना अवगत करण्यात यावी, असे निर्देश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
     या आढावा बैठकीस मुख्यालयातील महावितरणचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर महावितरणचे क्षेत्रीय सहव्यवस्थापकीय संचालक, प्रादेशिक संचालक, मुख्य अभियंता व अधीक्षक अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी व्हीडीओ कॉन्फरसिंगद्वारे या बैठकीला उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!