एक लाखांवर थकबाकीदारांचा वीजपुरवठा महावितरणकडून खंडित

Spread the love

• आर्थिक अडचणीमुळे महावितरणकडून कटू कारवाई 
कोल्हापूर • प्रतिनिधी
      वारंवार आवाहन करून देखील वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्याने आर्थिक अडचणीत असलेल्या महावितरणकडून नाईलाजाने गेल्या दीड महिन्यांमध्ये १ लाख १५ हजार ७८० अकृषक थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. सद्यस्थितीत पुणे, सातारा, सोलापूर, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, पथदिवे, सार्वजनिक पाणीपुरवठा व इतर १० लाख ५ हजार ७८३ अकृषक ग्राहकांकडे १९२३ कोटी १८ लाख रुपयांची थकबाकी आहे.
       लघुदाब वीजग्राहकांना थकबाकी व चालू बिलांचा घरबसल्या भरणा करण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in वेबसाईट व मोबाईल ॲपद्वारे ‘ऑनलाईन’ सोय उपलब्ध आहे. विशेष म्हणजे एका महिन्याचे वीजबिल थकीत असले तरी बिलाची रक्कम किती आहे हे न पाहता नियमानुसार वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे थकबाकी तसेच चालू वीजबिलांचा भरणा करून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
       पुणे प्रादेशिक विभाग अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात प्रामुख्याने ५३ हजार ६८५ घरगुती ग्राहकांकडे ७ कोटी ६४ लाख रुपये, ६ हजार ६५० वाणिज्यिक ग्राहकांकडे २ कोटी २८ लाख रुपये, ६०१५ औद्योगिक ग्राहकांकडे ५० कोटी ६९ लाख रुपये तसेच २३७० सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांकडे ९४ कोटी ४० लाख रुपये, २७८० पथदिव्यांच्या वीजजोडण्यांकडे ७० कोटी ५६ लाख रुपये व इतर अशा एकूण ७३ हजार ८१० अकृषक ग्राहकांकडे २२७ कोटी ५४ लाख रुपयांची थकबाकी आहे. गेल्या दीड महिन्यांच्या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात १२ हजार ४५५ थकबाकीदार अकृषक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.
       कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा दि. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झालेला आहे. कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत थकबाकीमुळे कायमस्वरुपी खंडित झालेला आहे. त्यांच्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ नुकतीच जाहीर केली आहे. या योजनेनुसार १०० टक्के व्याज व विलंब आकार माफ करण्यात आले आहे. तर मूळ थकबाकी भरण्यास सहा हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. एकाचवेळी मूळ थकबाकी भरल्यास उच्चदाब ग्राहकांना ५ टक्के व लघुदाब ग्राहकांना १० टक्के थकबाकीमध्ये अतिरिक्त सवलत देण्यात येत आहे.
       सध्या सुरु असलेल्या महावितरणच्या धडक मोहिमेमध्ये थकबाकीमुळे वीजपुरवठा खंडित केलेल्या वीजजोडण्यांची स्वतंत्र पथकांद्वारे पडताळणी सुरु आहे. थकबाकीदार शेजाऱ्यांकडून किंवा इतर ठिकाणाहून वायर किंवा केबलद्वारे विजेचा वापर करीत असल्याचे आढळल्यास शेजारी व संबंधित थकबाकीदारांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा २००३ च्या कलम १३५/१३८ नुसार कारवाई करण्यात येत आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!