प्रसाद रेशमे महावितरणच्या संचालक (प्रकल्प) पदी रूजू

Spread the love


मुंबई :
      महावितरण कंपनीचे संचालक (प्रकल्प) म्हणून प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी (दि.११) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते महावितरणमध्ये कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) म्हणून कार्यरत होते.
      संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे हे मूळचे गोंदीया येथील रहिवासी आहे. तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात श्री. रेशमे कनिष्ठ अभियंता म्हणून १९९७ मध्ये रुजू झाले. त्यानंतर सरळसेवा भरतीद्वारे कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंता, मुख्य अभियंता, प्रादेशिक संचालक, कार्यकारी संचालक या वरिष्ठ पदांवर त्यांची थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. यामध्ये श्री. रेशमे यांनी मुख्य अभियंतापदी नागपूर व जळगाव परिमंडल, प्रादेशिक संचालक म्हणून नागपूर प्रादेशिक विभाग तसेच कोकण प्रादेशिक विभागाचे सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून काम केले आहे.
       महावितरणचे कार्यकारी संचालक (पायाभूत आराखडा) म्हणून प्रसाद रेशमे यांनी मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना व सौर कृषिवाहिनी योजना, उच्चदाब वितरण प्रणाली, दिनदयाल उपाध्याय ग्रामज्योती योजना, एकात्मिक ऊर्जा विकास योजना, विद्युत वाहनांच्या चार्जिंग स्टेशन्स पुरविण्यासाठी नोडल एजन्सी म्हणून महावितरणची जबाबदारी आदींमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. शेतकऱ्यांसह सर्व वर्गवारीमधील ग्राहकांना नवीन वीजजोडण्या उपलब्ध करून देण्यासह ग्रामीण व शहरी भागातील वीजयंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणामध्ये महावितरणने केलेल्या कामगिरीत श्री. रेशमे यांचे योगदान आहे.
       विजेची वाढती मागणी तसेच वीजयंत्रणा सक्षमीकरण व विस्तारीकरणासाठी प्रस्तावित योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यास सर्वोच्च प्राधान्य राहील असे संचालक (प्रकल्प) प्रसाद रेशमे यांनी सांगितले.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!