कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) संघाशी सलग्न दूध उत्पादक शेतकऱ्यांना म्हैस व गाय दूध खरेदी दरामध्ये १ एप्रिल २०२२ पासून दरवाढ करण्यात येत आहे.
म्हैस दूध खरेदी दरामध्ये ६.० फॅट व ९.० एस.एन.एफ करीता त्यामुळे म्हैस दूध खरेदी दर ४१.५० पैसे वरून ४३.५० पैसे इतका होणार आहे. तसेच गाय दूध दरामध्ये ३.५ फॅट व ८.५ एस.एन.एफ करीता प्रतिलिटर दोन रूपये इतकी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे गाय दूध दर २७ रूपये वरून २९ रूपये इतकी दरवाढ करण्याचा निर्णय बुधवारी (दि.३०) संचालक मंडळाच्या मिटिंगमध्ये घेण्यात आला असल्याची माहिती चेअरमन विश्वास पाटील यांनी दिली.
चेअरमन विश्वास पाटील म्हणाले की, गोकुळ दूध संघाने गुढीपाडव्यापुर्वी दूध उत्पादकांसाठी दिलासा देणारी दरवाढ केली आहे. तसेच गोकुळने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळचे दूध उत्पादक, दूध संस्था, ग्राहक, वितरक, कर्मचारी, वाहतूक ठेकेदार व हितचिंतक यांना गोकुळ परिवाराच्यावतीने गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या.