कोल्हापूर • प्रतिनिधी
एडी सायंटिफिक इंडेक्स संस्थेने घेतलेल्या सर्वेक्षणात शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे प्रा. डॉ. आण्णासाहेब मोहोळकर यांना जगातील नामांकित शास्त्रज्ञांमध्ये स्थान मिळाले आहे.
एडी सायंटिफिक इंडेक्समार्फत जगातील नामांकित शास्त्रज्ञांची यादी गुगल स्कॉलरचा आधार घेऊन दरवर्षी जाहीर केली जाते. यामध्ये शोधनिबंध, एच इंडेक्स, आय टेन इंडेक्स तसेच संशोधन संबंधित रिव्युव्हर तसेच एडिटर म्हणून केलेले सर्व कार्य इत्यादी निकषाच्या साहाय्याने हि क्रमवारी ठरविली जाते. गतवर्षी अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात डॉ. मोहोळकर यांना जागतिक क्रमवारीत टॉप २ परसेंट शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते. याचबरोबर २०१९ साली सरदार रणजितसिंह सचदेव फौंडेशन, मुंबई यांच्यामार्फत ”युवा शास्रज्ञ” पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते.
डॉ. मोहोळकर यांनी पदार्थविज्ञानामध्ये दक्षिण कोरिया येथून पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळविली असून त्यांचे संशोधन क्षेत्रातील कार्य उल्लेखनीय आहे. डॉ. मोहोळकर हे शिवाजी विद्यापीठामध्ये सहाय्यक प्राध्यापक या पदावरती कार्यरत असून त्यांना २९ वर्षे संशोधनातील अनुभव आहे. सौर ऊर्जा, गॅस सेन्सिंग, सुपरकॅपॅसिटर इत्यादी बाबीवर त्यांनी पेटंट मिळविले आहेत. त्यांनी आजवर संशोधन क्षेत्रात भरीव कामगिरी केली आहे. २००९ साली बॉईजकास्ट फेलो अर्थातच बेटर अँपॉर्च्युनिटीज फॉर यंग सायंटिस्ट इन च्यूझन एरियाज ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी म्हणून भारतातून ७२ तर महाराष्ट्रातून २ जणांची निवड करण्यात आली होती, त्यापैकी ते एक आहेत. दक्षिण कोरिया येथे दोन वर्षे संशोधन करून त्यांनी आतापर्यंत १७० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व याचा संदर्भ जवळपास ६७५० हुन अधिक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधासाठी घेतला आहे. त्यांनी भारत शासनाकडून आजवर संशोधन प्रकल्पासाठी १.५ कोटीहुन अधिक रुपयांचा निधी आणला आहे. ते शिवाजी विद्यापीठाचे संशोधक मार्गदर्शक म्हणून कार्यान्वित आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आत्तापर्यंत १२ विद्यार्थ्यांनी आपली पीएच डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे तर २ विद्यार्थी पीएच डी शिक्षण घेत आहेत. पदव्युत्तर स्तरावरील विज्ञान प्रकल्पासाठी त्यांनी १२० हुन अधिक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. त्यांनी जर्मनी येथील जगविख्यात लॅम्बर्ट पब्लिशिंग हाऊसमध्ये २ पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. तसेच त्यांची विविध जर्नल्ससाठी ६ हुन अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधापैकी २३ शोधनिबंध सायन्स डायरेक्टच्या विविध जर्नल्स मध्ये टॉप २५ मध्ये गणले गेले आहेत. त्यांनी संशोधन क्षेत्रामध्ये तज्ञ म्हणून आजपर्यंत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर २० हुन अधिक व्याख्याने दिली आहेत. त्यांनी आजवर ५० हुन अधिक कार्यशाळा, प्रशिक्षणे, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदा, चर्चासत्र यामध्ये सहभाग दर्शविला आहे. ते १७ आंतरराष्ट्रीय नामवंत जर्नल्सचे पुनरावलोकनकर्ता म्हणून परिचयाचे आहेत.त्यांनी आजवर कित्येक गरीब , होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठविले आहेत. डॉ. मोहोळकर एक उत्तम लेखकदेखील आहेत. मराठी वाङमय, साहित्य व कवितांविषयी त्यांना विशेष ओढ आहे. ते एक उत्तम वक्ते, साक्षेपी व व्यासंगी अभ्यासक आहेत. एकंदरीतच शिक्षण, सामाजिक, संशोधन क्षेत्रात त्यांनी केलेले कार्य गौरवास्पद आहे.
———————————————– Attachments area
![]() | ReplyForward |