प्रा.डॉ. जे.एफ. पाटील यांना डी.वाय. पाटील विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर


कोल्हापूर • प्रतिनिधी
      येथील डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाकडून सन २०२१-२२ या वर्षाचा “डॉ.डी.वाय. पाटील जीवनगौरव पुरस्कार” सुप्रसिद्ध अर्थतज्ञ व शिक्षणतज्ञ प्रा.डॉ. जे. एफ. पाटील यांना नुकताच जाहीर करण्यात आला. विद्यापीठाचा वर्धापनदिन बुधवारी (दि.१) सकाळी ९ वाजता साजरा होणार आहे. या कार्यक्रमात सदर पुरस्काराने प्रा. पाटील यांना सन्मानित करण्यात येणार आहे.
    प्रा. पाटील यांनी दीर्घकाळ शिवाजी विद्यापीठात अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. त्याशिवाय विद्यापीठ व सामाजिक संस्था तद्वतच शासकीय विविध मंडळांवर सदस्य म्हणून आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. ते महाराष्ट्र शासनाच्या नियोजन विभागाचे सदस्य होते. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे, शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष व भारतीय कृषी अर्थशास्त्र परिषदेचे उपाध्यक्ष होते. इचलकरजी येथील समाजवादी प्रबोधिनीचे ते संचालक सदस्य आहेत. त्यांची इंग्रजी व मराठीमध्ये अर्थशास्त्राची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे अर्थशास्त्रावर प्रासंगिक भाष्य करणारे अनेक लेख राष्ट्रीय संशोधन पत्रिकेमधून विविध वृत्तपत्रातून व मासिकातून प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी संशोधन पदव्या प्राप्त केल्या आहेत. यापूर्वी विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य उत्तम शिक्षक पुरस्कार, डॉ. श्री. आ. देशपांडे जीवनगौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्काराने त्यांना याआधी सन्मानित करण्यात आले आहे.
      डॉ. प्रा. पाटील यांच्या या निवडीबद्दल डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाने आदर्श शिक्षक पुरस्कार, आदर्श सेवक पुरस्कार, विज्ञानाचार्य, कार्यरत्न, उत्कृष्ट संशोधक, गुणवंत विद्यार्थी असेही पुरस्कार देण्यात येणार आहेत.   
     या कार्यक्रमात प्राध्यापक पाटील यांच्या अर्थाभिव्यक्ती’ व ‘Essays in Economics Persuasian’ या पुस्तकांचेही प्रकाशन होणार आहे. या  कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी राहूल रेखावार हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून कुलपती डॉ. संजय डी. पाटील हे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल हे विद्यापीठाच्या प्रगतीचा अहवाल सादर करणार आहेत. यावेळी डी. वाय पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, पृथ्वीराज पाटील, तेजस पाटील यांचीही उपस्थिती आहे.
——————————————————- Attachments areaReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *