घोडावत पॉलिटेक्नीकच्या प्रा.संदीप वाटेगावकर यांना शिवाजी विद्यापीठाकडून पीएच.डी. प्रदान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      संजय घोडावत पॉलिटेक्निकचे प्रा.संदीप राजाक्का भास्कर वाटेगावकर यांना नुकतीच शिवाजी विद्यापीठाकडून रसायनशास्त्र विषयामध्ये पीएच.डी. ही मानाची पदवी प्राप्त झाली. ”स्टडीज ऑन सिंथेसिस, प्रॉपर्टीज अँड ऍप्लिकेशन्स ऑफ डाय सेन्सिटाईझ्ड मिक्सड ट्रान्झिशन मेटल ऑक्साईड थीन फिल्म्स” हा त्यांचा पीएच.डी.चा मुख्य विषय होता. यासाठी त्यांना त्यांचे पीएच.डी. मार्गदर्शक केआरपी कन्या महाविद्यालय, इस्लामपूरचे रसायनशास्त्र विभागाचे प्रोफेसर व विभागप्रमुख डॉ.आर.के.माने व जयसिंगपूर कॉलेजचे प्रोफेसर व एमएस्सी रसायनशास्त्र विभागाचे मुख्य समन्वयक डॉ.बी.एम.सरगर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
      बाजारात मिळणाऱ्या सिलिकॉन सौर घटाची किंमत जास्त असून सध्या तो सामान्य माणसाला परवडणारा नाही, म्हणून डॉ. वाटेगावकर यांनी रासायनिक अभिक्रिया विकसित करून अधिक कार्यक्षम रंगमिश्रित सौर घटाची निर्मिती केली आहे. हा सौर घट ढगाळ वातावरणातदेखील प्रकाश शोषित करून आपली कार्यक्षमता दर्शवतो. तसेच हा सौर घट सामान्यांना परवडणारा असून दुर्गम ठिकाणीदेखील याचा वापर केला जाऊ शकतो असे मत डॉ.संदीप वाटेगावकर यांनी व्यक्त केले. आधुनिक पद्धतीचा हा सौरघट बनविण्यासाठी दक्षिण कोरियाचे शास्त्रज्ञ डॉ.सावंता माळी व डॉ.विनायक पारळे यांचे विशेष सहकार्य लाभले. त्याचबरोबर डॉ. आण्णासाहेब मोहोळकर, डॉ.के.एम. गरडकर, डॉ.राणी पवार, डॉ.दादा नाडे डॉ.रोहित पवार व डॉ.संभाजी पवार यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. हे संशोधन त्यांनी एल्सविअरच्या नामांकित अशा सिरॅमिक इंटरनॅशनल या टॉप जर्नल्समध्ये प्रसिद्ध केले आहे.
      डॉ. वाटेगावकर यांनी आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये ९ हुन अधिक शोधनिबंध प्रसिद्ध केले आहेत तर आंतरराष्ट्रीय संशोधन परिषदेमध्ये २० हुन अधिक ठिकाणी आपले संशोधन सादर केले आहे. त्यांच्या संशोधन कार्याची दखल घेऊन त्यांना आत्तापर्यंत अमेरिका, दक्षिण कोरिया, इंग्लंड, स्वित्झर्लंड, जर्मनी, ऑस्ट्रेलिया व फ्रान्स या देशांनी आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये वक्ता म्हणून निमंत्रित केले आहे.  
      त्यांनी शालेय शिक्षण जि.प. शाळा व बोरगाव हायस्कूल, उच्च माध्यमिक – विद्यामंदिर हायस्कूल, इस्लामपूर तर बी.एस्सी शिक्षण के.बी.पी. कॉलेज, इस्लामपूर याठिकाणी पूर्ण केले. यानंतर त्यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथून एम.एस्सी रसायनशास्त्र व शिवाजी विद्यापीठातून आपले पीएच.डी पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
      याबद्दल बोलताना डॉ.वाटेगावकर म्हणाले ” सिलिकॉन सौर घट हे अतिशय महागडे आहेत व त्यामुळे आम्ही रासायनिक अभिक्रिया विकसित करून अगदी कमी खर्चात टिटॅनियम डायऑक्साइड हे सेमीकंडक्टर नॅनोमटेरिअल बनविले व त्यावर रुदेनिअम-७१९ या प्रभावी रंगाचे लोडींग केले. खर्च आणि कार्यक्षमतेचा विचार केल्यास रंगमिश्रित सौर घट हे प्रभावी आहेत. माझ्या यशात आई-वडील, पत्नी, मार्गदर्शक, मित्र परिवार व घोडावत मॅनेजमेंटचे सहकार्य लाभले.
       डॉ.वाटेगावकर यांच्या यशाबद्दल विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले. यावेळी डॉ.आर.के.माने, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव, डॉ..ए.डी.सावंत, डॉ.संभाजी पवार, डॉ.राणी पवार, डॉ.दादा नाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!