प्रा.श्रीनिवास कोंडुती यांचा ‘एज्युकेशन एक्सलन्स’ पुरस्काराने गौरव

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संजय घोडावत आय आय टी मेडिकल अकॅडमीचे संचालक प्रा.श्रीनिवास कोंडुती (वासू सर) यांना घोडावत विद्यापीठाकडून ”एज्युकेशन एक्सलन्स” पुरस्काराने गौरविण्यात आले. संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत यांच्या हस्ते वासू सर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.    यावेळी व्यासपीठावर अभिनेते सचिन खेडेकर, अभिनेत्री प्राजक्ता माळी, सौ.नीता घोडावत आदी मान्यवर उपस्थित होते.
       शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल प्रा. श्रीनिवास कोंडुती यांचा सन्मान करण्यात आला आहे. उद्योगपती संजय घोडावत यांच्या ५७ व्या वाढदिवसानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान करण्यात आला, त्यापैकी वासू सर एक आहेत.
      वासू सर हे मूळचे हैदराबादचे असून त्यांनी तेथूनच शालेय शिक्षण ते एमएस्सी रसायनशास्त्र पर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर त्यांनी आयआयटी साठी तयारी करून घेणाऱ्या प्रसिद्ध नारायण अकॅडमी मध्ये प्राध्यापक म्हणून काम पाहिले. तसेच दरम्यानच्या काळात २ वर्षे अमेरिकेतील नामवंत शिक्षण संस्थेत प्राध्यापक म्हणून काम केले. २०१४ साली ते संजय घोडावत आय आय टी व मेडिकल अकॅडमीचे संचालक म्हणून रुजू झाले. सुरुवातीस ३०० विद्यार्थ्यांवर सुरु केलेल्या या अकॅडमीमध्ये आज ४००० हुन अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
      वासू सरांच्या नेतृत्वाखाली अकॅडमीने यशाची अनेक शिखरे सर केली आहेत. आजपर्यंत या अकॅडमीचे २०० हुन अधिक विद्यार्थी नामवंत आय आय टीमध्ये तर ३०० हुन अधिक विद्यार्थी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आपले पुढील शिक्षण पूर्ण करीत आहेत. याचबरोबर २०१६ साली या स्पर्धा परीक्षांची मूलभूत तयारी करून घेण्याच्या उद्देशाने या अकॅडमीअंतर्गत ऑलिम्पियाड स्कुल सुरु करण्यात आले व येथील विद्यार्थ्यांनीदेखील डॉ.होमी भाभा बाल वैज्ञानिक परीक्षा, प्रज्ञा शोध परीक्षा तसेच इतर परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. या अकॅडमीच्या एकूण ८ शाखा आहेत. वासू सरांनी आपली खरी ओळख निर्माण केली ती त्यांनी सुनियोजन करून राबविलेला ”घोडावत पॅटर्न” व उच्चांकी निकालाची परंपरा. यांच्या जोरावरच त्यांनी विद्यार्थी व पालकांचा विश्वास संपादन केला आहे.
       एक आदर्श प्राध्यापक ते उत्तम शिक्षणतज्ज्ञ म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी नीट, जेईई, सीईटी या सारख्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रात आपल्या प्रशासनाचा अमीट ठसा उमटविला आहे. शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना याआधी ”गोल्डन मॅनेजमेंट अवॉर्ड”ने गौरविण्यात आले आहे.
याबद्दल अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————- 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!