महाविकास आघाडीच्या निषेधार्थ भाजयुमोतर्फे होळी आंदोलन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     गेल्या अडीच वर्षात प्रत्येक आघाडीवर अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवत भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने होळी पेटवून आंदोलन करण्यात आले.
     गेली अडीच वर्षे आघाडी सरकारचे अनेक दिग्गज नेते विविध प्रकारचा भ्रष्टाचार करून सामान्य जनतेचा विश्वासघात करत आले आहेत व दिलेली आश्वासने न पाळता जनतेचा विश्वासघात करण्यात यशस्वी झाले असल्याची टीका करण्यात आली.
     भाजयुमो जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे – पाटील म्हणाले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण हायकोर्टात टिकवून ठेवले. तेच सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडीला सुप्रीम कोर्टात टिकवता आले नाही. तसेच ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षणही घालवले. कोरोनामुळे लॉकडाऊन काळामधील वीजबिल माफ करु असे आश्वासन दिले पण प्रत्यक्षात  ‘वीजबिल भरा अन्यथा वीज पुरवठा खंडित करण्यात येईल’ असा फतवा काढत नितीन राऊत यांनी आपले आश्वासन पाळले नाही. तसेच आरोग्य खात्यातील नोकर भरती परीक्षा दोनदा ऐनवेळेला रद्द करून पुढे ढकलावी लागली, ज्यामुळे अनेक परिक्षार्थींचे नुकसान झाले. एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप तीन महिन्यांहून अधिक काळ अद्याप चालू आहे पण तरीदेखील अजून त्यांच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा ७/१२ कोरा केला जाईल व त्यांना कर्जमाफी मंजूर करून दिली जाईल असे आश्वासन देऊन ते आश्वासन न पाळणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे महाविकास आघाडी सरकार लवकरात लवकर जाऊन भारतीय जनता पार्टीचे सरकार स्थापन व्हावे, असे साकडे आई अंबाबाईकडे या होळीच्या निमित्ताने करूया.
     सरचिटणीस विवेक वोरा म्हणाले की, भ्रष्टाचार व गुन्हेगारी प्रवृत्ती असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारच्या अनेक नेत्यांना पाठी घालणारे  शरदचंद्रजी पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने किमान २२ आंदोलने करण्यात आली, त्यावेळी महाविकास आघाडी सरकारमधील कोणीही एकत्र आले नाहीत परंतु ज्यावेळी देशद्रोही व दाऊदशी संबंध असणाऱ्या नवाब मलिक यांना अटक करण्यात आली तेव्हा त्यांची पाठराखण करण्यासाठी महाविकास आघाडीतील सर्व नेते एकाच व्यासपीठावर एकत्र आले.
      या होळी आंदोलनास गिरीश साळोखे, सुनील पाटील, प्रदीप घाटगे, सिद्धान्त भेंडवडे, गौरव सातपुते, अमित संकपाळ, रोहित कारंडे, अमित शिंदे, ओंकार घाटगे, प्रसाद पाटोळे, ओंकार गोसावी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!