भोपळा महोत्सवास उदंड प्रतिसाद

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील निसर्ग मित्र संस्था व आदर्श सहेली मंच यांच्या संयुक्त विद्यमाने संक्रांतीनिमित्त घरोघरी भोपळा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या भोपळा महोत्सवास सागरमाळ परिसर, महालक्ष्मीनगर, मंगेशकरनगर, बेलबाग, प्रतिभानगर परिसरातील महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.
      आरोग्यदायी भोपळ्याच्या बिया आपल्या परसबागेत लावून त्यांपासून मिळणाऱ्या भोपळ्यांचा घरोघरी आस्वाद  घ्यावा असे आवाहन निसर्ग मित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले यांनी आपल्या ऑनलाईन मनोगतातून व्यक्त केले.
      यावेळी संस्थेतर्फे घरोघरी महिलांना तांबडे भोपळे वितरण करण्यात आले होते. भोपळा म्हटलं की भोपळ्याचे घारगे डोळ्यासमोर येतात. परंतु महिलांनी भोपळ्यापासून कटलेट, गुळशेल, पंमकिंग कस्टर्ड, भोपळापुरणपोळी, हलवा, भरीत, रायता, फ्राय भाजी, पराठा, भोपळा राईस, घारगे असे नाविन्यपूर्ण आणि पौष्टीक पदार्थ केले होते.
      सहभागी सर्व महिलांना अखंड भोपळे देऊन गौरवण्यात आले. बनवलेल्या पदार्थांचा उपस्थित निसर्गप्रेमींनी आस्वाद घेतला.  
       या महोत्सवाचे संयोजन पराग केमकर, राणिता चौगुले, राजेश्री पेटकर, मंगल पाटील, मोनाली पेटकर, अस्मिता चौगुले, बाबू आडुळकर यांनी केले. विजय रानमाळे व दिलीप पेटकर यांचे मोलाचे सहकार्य या महोत्सवासाठी लाभले.
                                गुणकारी भोपळा…..
      व्यायामादरम्यान जाणवणारा थकवा कमी करण्यास भोपळा मदत करतो. भोपळ्यामुळे रक्तातील लॅक्टीक अ‍ॅसिड आणि अ‍ॅमोनिया घटक कमी होण्यास मदत होते. फायबरच्याबरोबरीने भोपळ्यात पाण्याचा अंशदेखील मुबलक असतो. भोपळ्यात ९० टक्के पाणी असते. आहार विशेषतज्ञांच मत आहे की, भोपळा हृदयरोगींसाठी अत्यंत लाभदायक आहे. तो कोलेस्ट्राल कमी करताे, हा उष्णता कमी करणारा आणि मूत्रवर्धक आहे. तसेच पोटाच्या गडबडी कमी करणारा आहे. रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित करताे आणि अग्न्याशयला सक्रिय करताे. यामुळे चिकित्सक मधुमेह रूग्णांसाठी भोपळा खाण्याचे सल्ला देतात. याचा रसपण स्वास्थ्यवर्धक मानला जातो. भोपळ्यात मुख्यतः बीटा केरोटीन असते, ज्यामुळे विटामिन ए मिळते. पिवळ्या आणि नारंगी रंगाच्या भोपळ्यात केरोटीनचे प्रमाण जास्त असते. भोपळ्याच्या बिया आयरन, झिंक, पोटेशियम आणि मॅग्नेशियमचे चांगले स्रोत आहे. जगभरात याचा उपयोग केला जातो. त्यामुळे २९ सप्टेंबरला ‘पंपकिन डे’ म्हणून साजरा केला जातो

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!