भौगोलिक मानांकन प्राप्त शेतमालास क्यूआर कोडचा वापर करावा: सुभाष घुले

Spread the love

• क्यूआर कोड वापराबाबतची कार्यशाळा उत्साहात
कोल्हापूर • प्रतिनिधी
      शेतमालाच्या गुणवत्तेसाठी क्यूआर कोडचा वापर कार्यशाळा उत्साहात पार पडली. यावेळी पणनचे उपसरव्वस्थापक सुभाष घुले यांनी मार्गदर्शन केले. कोल्हापूर जिल्ह्यातील केळी, गुळ, आजरा घनसाळ व नाचणी इत्यादी शेतमालाचे मार्केटिंग करतांना शेतकऱ्यांनी क्यूआर कोडचा वापर करण्याची गरज निर्माण झाल्याचे श्री. घुले यांनी नमुद केले व ग्राहकांचा विश्वास संपादन करण्याची संधी शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे. क्यूआर कोडमुळे ग्राहकांना शेतमालाच्या गुणवत्तेबाबत हमी मिळणार असून शेतकऱ्यांना अधिकचा दर मिळण्यास मदत होणार असल्याचे सांगितले.
       महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, कोल्हापुर, फॅमिली फार्मिंग शेतकरी उत्पादक कंपनी यांचे संयुक्त विद्यमाने मोरेवाडी येथील मॅनेज प्रशिक्षण केंद्रात बुधवारी (दि.१) शेतमालाच्या गुणवत्तेसाठी क्यूआर कोडचा वापर याबाबत कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या  कार्यशाळेचे उद्घाटन दीपप्रज्वलनाने झाले. गणेशमुर्ती व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन कृषिभूषण सुधीर चिवटे यांचे हस्ते झाले.
     उद्घाटनप्रसंगी गुळ संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. बी. जी. गायकवाड, पणनचे उपसरव्यवस्थापक सुभाष घुले, फॅमिली फार्मिंग प्रा. लि.चे चेअरमन उदय पाटील, कृषिभूषण पी.डी. सावंत, आजरा घनसाळचे संभाजी सावंत, इनोटेरा टेकचे रजनीश खरे, राज दवे व अजय उजागरे आदी उपस्थित होते.
      इनोटेरा कंपनीच्यावतीने श्री. खरे, श्री. दवे व श्री. उजागरे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी एखाद्या शेतमालाचे क्यूआर कोड करण्यासाठी सुरवातीस अंदाजित रक्कम रु. १५,०००/- पर्यंत खर्च एकवेळ करणे आवश्यक असुन त्यानंतर प्रति स्टिकर खर्च येतो. यामध्ये त्यांनी केळी पिकासाठी ३० पैसे प्रति किलो प्रति स्टिकर, आजरा घनसाळ भातासाठी ६० पैसे प्रति किलो प्रति स्टिकर, गुळासाठी ३० पैसे प्रति किलो प्रति स्टिकर खर्च अपेक्षित असल्याचे नमुद केले.
क्यूआर कोडमुळे ग्राहकांना सदर उत्पादना संदर्भातील उत्पादकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक, उत्पादना विषयी सविस्तर माहिती, भौगोलिक ठिकाण, उत्पादन काढल्याचे दिनांक, पॅकिंग केल्याचे दिनांक इत्यादी बाबतची माहिती प्राप्त होणार आहे. क्यूआर कोडच्या वापरामुळे शेतकरी मार्केटिंगसाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन डिजिटलायझेशनच्या युगामध्ये प्रवेश करणार हे नक्की.
     कार्यक्रमाच्या शेवटी पणन मंडळचे अनुप थोरात यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!