राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उठावशिल्पाचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते अनावरण

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कसबा बावडा येथील सेवा रुग्णालयातील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या उठावशिल्पाचे श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सतेज पाटील प्रमुख उपस्थित होते.
     यावेळी आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, मधुरिमाराजे छत्रपती, यशराजे छत्रपती, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, सीपीआर रुग्णालयाच्या बाह्यसम्पर्क वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षला वेदक, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. उमेश कदम व अन्य मान्यवर उपस्थित होते.
     ‘राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपत हे सेवा रुग्णालय गरीब व गरजूंना चांगल्याप्रकारे वैद्यकीय सेवा देत आहे’, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
     राजर्षी शाहू महाराज यांनी राज्यकारभार करताना सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेकडे देखील विशेष लक्ष दिले होते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटल म्हणजे आजचे वैद्यकीय सेवा रुग्णालय होय. जून १८९७ मध्ये “करवीर सरकारचे गॅझेट” मध्ये द व्हिक्टोरिया डायमंड जुबिली हॉस्पिटलच्या पायाभरणी समारंभाची  ‘तंतोतंत वेळेची’ कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करण्यात आली आहे. यात या समारंभानिमित्त गरीबांना अन्नदान, वस्त्रदान, महाव्याधीग्रस्त  लोकांना भोजन, विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आदी बाबींचा उल्लेख करण्यात आला असल्याची माहिती डॉ. उमेश कदम यांनी दिली.
     या रुग्णालयाच्या ऐतिहासिक जुन्या इमारतीचा पायाभरणी समारंभ दि. २१ जून १८९७ मध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत झाला होता. १८९७ मध्ये ‘द व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली हॉस्पिटल’ या नावाने सुरू झालेले हे रुग्णालय लष्करासाठी बांधण्यात आले होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या विचारांचा वारसा जपून सध्या अद्ययावत उपकरणांसह सज्ज असणारे हे  ‘सेवा रुग्णालय’ गरीब व गरजू रुग्णांना वैद्यकीय सेवा देत आहे.
     रुग्णालयाच्या पायाभरणी समारंभाला १२४ वर्ष पूर्ण होवून यावर्षी १२५ व्या वर्षात पदार्पण होत आहे. या घटनेचे औचित्य साधून पायाभरणी समारंभाच्या दुर्मिळ छायाचित्रावरुन उठावशिल्प (म्युरल) साकारण्यात आले आहे. श्रीमंत मालोजीराजे छत्रपती व मधुरिमाराजे छत्रपती यांच्यावतीने हे उठावशिल्प  रुग्णालयाला देण्यात आले आहे. हे शिल्प वास्तुशास्त्रज्ञ वैशाली चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!