राजर्षी शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाचे आ. पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       कोल्हापूर महानगरपालिका आरोग्य विभागामार्फत राजर्षी छत्रपती शाहू महाराज दिव्यांग सक्षमीकरण अभियानाचे उद्घाटन आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाले. या मध्यमातून दिव्यांगांना स्वावलंबन कार्ड देण्यासाठी विशेष तपासणी शिबिराची सुरुवात झाली आहे. दोन दिवसात हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल दिव्यांग बांधवांनी यावेळी आमदार पाटील यांचे आभार मानले.
       सीपीआर रुग्णालयातील मानस उपचार विभागामध्ये हे कायमस्वरूपी शिबीर सुरु करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये ऑनलाईन नोंदणीकृत दिव्यांगांची तपासणी करून ४० टक्केवरील बाधितांना स्वावलंबन कार्ड देण्यात येणार आहे. जिल्ह्यात जवळपास ४२ हजार जणांनी युडीआयडी कार्डसाठी नोंदणी केली आहे. त्यामुळे या यंत्रणेवर ताण होता. तो कमी करण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेत महापालिकेअंतर्गत नोंदणी केलेल्यांसाठी वेगळा विभाग रविवारपासून सुरु करण्यात आला.
      याप्रसंगी बोलताना आ.ऋतुराज पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु झाल्याचे सांगितले. आतापर्यंत आम्ही नेहमीच दिव्यांगांच्या पाठीशी उभे राहिलो आहे, यापुढेही असेच ठामपणे पाठीशी राहू अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार पाटील यांनी सर्व विभागाची पाहणी करून डॉक्टरांकडून सर्व माहिती समजावून घेतली. त्याचबरोबर दिव्यांगाना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना दिली. उपस्थित सर्व दिव्यांग बांधवांची आपुलकीने चौकशी करत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, कर्मचाऱ्यांशीही संवाद साधला.
      याप्रसंगी सीपीआरचे अधिष्ठाता डॉ. प्रदीप दीक्षित, वैद्यकीय अधीक्षक डॉ. गिरीश कांबळे, महानगरपालिका उपायुक्त रविकांत आडसूळ, डॉ. महेंद्रकुमार बनसोडे, डॉ. कौस्तुभ गाटे, डॉ. गौरव कोठारी, दिव्यांग विभाग प्रमुख विकास चौगुले, संजय अडके यांच्यासह शहरातील विविध दिव्यांग संघटना उपस्थित होत्या.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!