• शनिवारी पुस्तकाचे प्रकाशन
कोल्हापूर • प्रतिनिधी
‘शाही राज्यारोहण समारंभ’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दि.३०) होणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी या पुस्तकाला शुभेच्छा संदेश दिलेला असून जेष्ठ इतिहास संशोधक आणि राजर्षी शाहू गौरवग्रंथाचे संपादक प्रा.डॉ. रमेश जाधव यांची प्रस्तावना आहे. राजर्षी शाहू छत्रपतींच्या स्मृतिशताब्दी वर्षात त्यांच्या राज्यारोहण समारंभाचे वर्णन करणारा हा दुर्मिळ दस्तऐवज पुनः प्रकाशित करत असल्याची माहिती लेखक यशोधन जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी चेतन जोशी व रविकिशोर माने उपस्थित होते.
३० एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणाऱ्या समारंभात या पुस्तकाचे प्रकाशन श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते होईल. पालकमंत्री सतेज पाटील हे या कार्यक्रमाचे अध्यक्ष तर श्रीमंत मालोजीराजे छत्रपती हे प्रमुख पाहुणे आहेत. त्याचबरोबर २ एप्रिल १८९४ साली राज्यारोहण समारंभास उपस्थित असणाऱ्या कोल्हापूर दरबारच्या जहागिरदार, मानकरी आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींच्या वंशजांना ही आमंत्रित करण्यात आले आहे.
१८८४ साली छत्रपती शाहू महाराज हे कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यात दत्तक आले. त्यावेळी त्यांचे वय फक्त १० वर्षांचे असल्याने महाराजांचे शिक्षण पूर्ण होईतोवर कोल्हापूर दरबारच्या रिजन्सी कौन्सिल आणि रेसिडेंट ह्यांनी राज्यकारभार पाहिला. १८९४ साली महाराजांनी विशीत प्रवेश केला आणि त्याचवेळी त्यांचे शिक्षणही पूर्ण झाले. ह्यानंतर त्यांच्या हाती प्रत्यक्ष राज्यकारभार अर्थात मुखत्यारी देण्याबद्दल चर्चा होऊन २ एप्रिल १८९४ रोजी मुंबईचे गव्हर्नर लॉर्ड हॅरिस ह्यांच्या उपस्थितीत कोल्हापूरला हा राज्यारोहण समारंभ होईल हे निश्चित झाले आणि हा समारंभ शाही इतमामात पार पडला. पाच दिवस चाललेल्या या समारंभाचे वर्णन आजवर आपल्याला तत्कालीन मोजक्या पत्रांतूनच समजून घ्यावे लागत असे. पण आत्ता या समारंभाची माहिती देणारा अस्सल वृत्तांत पुनः प्रकाशित होत आहे.