कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी संपूर्ण देशाला व जगाला समतेचा संदेश दिला. राजर्षी शाहूंचे विचार, त्यांनी घेतलेले अनेक निर्णय आणि कार्य दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन करुन राजर्षी शाहू महाराजांचे जन्मस्थळ ‘लक्ष्मी विलास पॅलेस’ ची उर्वरित कामे मार्गी लागण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही पालकमंत्री सतेज पाटील यांनी आज दिली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १४७ व्या जयंतीनिमित्त पालकमंत्री सतेज पाटील यांनी कसबा बावडा येथील लक्ष्मी विलास पॅलेस या राजर्षी शाहू महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट देऊन राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनीही राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी खा. संजय मंडलिक, माजी मंत्री आमदार चंद्रकांत पाटील, आ. ऋतुराज पाटील, आ. चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, इतिहास संशोधक, राजर्षी शाहू प्रेमी व अन्य मान्यवर उपस्थित होते.
राजर्षी शाहू जयंतीच्या शुभेच्छा देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, समतेचा संदेश साऱ्या जगाला देणाऱ्या कर्तृत्ववान राजाचे स्मरण करणे, ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. लक्ष्मी विलास पॅलेसची प्रलंबित कामे गतीने मार्गी लागण्यासाठी आवश्यक ते सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. सक्तीचे शिक्षण, होस्टेलची निर्मिती असे अनेक निर्णय घेऊन सर्वसामान्यांना आधार देण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले होते. लोकशाही व्यवस्थेत राजर्षी शाहूंचे विचार डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसाला आधार देण्याचं राज्य शासनाचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी संस्थांनामध्ये लोकहिताचे अनेक अलौकिक निर्णय घेतले. त्यांचे विचार अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणं आणि त्यांनी दिलेल्या संदेशाचे स्मरण करुन त्यांच्या पावलावर पाऊल टाकून पुढे वाटचाल करणं गरजेचं आहे.
खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन जयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या