कोल्हापूर •
कृषीपंप वीज जोडणी धोरण २०२० अंतर्गत शेतकऱ्यांना वीज बिल थकबाकीची ५० टक्के रक्कम भरल्यास ५० टक्के सूट मिळणार आहे. शेतकऱ्यांनी भरलेल्या रक्कमेतून ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत स्तरावर तर ३३ टक्के रक्कम जिल्हा स्तरावर विद्युत यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी वापरली जाणार आहे. तेंव्हा शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी केले.
महावितरणच्या जयसिंगपूर विभागीय कार्यालयात ग्राहक संपर्क अभियाना दरम्यान ना. राजेंद्र पाटील – यड्रावकर यांनी भेट दिली. त्यावेळी कृषीपंप थकबाकी भरलेल्या ग्राहकांना प्रातिनिधिक स्वरूपात त्यांनी पावती प्रदान केली. ग्रामपंचयात, विविध कार्यकारी सोसायटी व महिला बचत गटांनी थकबाकी वसुली केल्यास प्रोत्साहनपर रक्कम मिळणार असल्याने या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांपर्यंत ही योजना पोहचवावी अशा सूचना त्यांनी दिल्या.
यावेळी कार्यकारी अभियंता मकरंद आवळेकर, अतिरिक्त कार्यकारी अभियंता पी.आर. तौर, थकबाकी भरणा केलेले ग्राहक एन .बी. गुळवणी, चेअरमन महादेव स्वामी, गजेंद्र राजपूत, साराजाबाई कांबळे, डॉ. सुहास धनपाल यांच्यासह अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.