कोल्हापूर • प्रतिनिधी
डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांची नवी दिल्ली येथील भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएमआर) नियामक मंडळावर निवड झाली आहे. आयसीएमआर ही भारतातील बायोमेडिकल संशोधन निर्मिती, समन्वय आणि संवर्धन यासाठी काम करणारी सर्वोच्च संस्था असून जगातील सर्वात जुन्या वैद्यकीय संशोधन संस्थांपैकी एक आहे.
संपूर्ण देशासाठीचे वैद्यकीय व त्यासंबंधित धोरण ठरवणाऱ्या आयसीएमआरच्या नियामक मंडळावर ४८ सदस्य कार्यरत आहेत. यातील मेडिकल फॅकल्टीचे ३ प्रतिनिधी ३ वर्षांच्या कालावधीकरिता निवडणुकीद्वारे निवडले जातात. यासाठी असोसिएशन ऑफ इंडियन युनिवर्सिटीचे सदस्य म्हणून कुलगुरूंना मताधिकार असतो. देशभरातून निवडल्या जाणाऱ्या या ३ सदस्यांमध्ये डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी सर्वोच्च मतांनी विजय मिळवला आहे. देशाच्या सर्वोच्च मंडळावर डॉ. शर्मा याच्या झालेल्या या निवडीमुळे कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.
डॉ. राकेश शर्मा हे आयजीएमसी शिमला आणि सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय, पुणेचे माजी विद्यार्थी असून १९८२ ते १९९८ पर्यंत सोळा वर्षे त्यांनी आर्मी मेडिकल कॉर्प्समध्ये सेवा केली आहे. त्यानंतर भारत व परदेशात वैद्यकीय अधीक्षक, संशोधन संचालक, प्रसूती आणि स्त्रीरोग विभागात प्राध्यापक व वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता म्हणून काम केले. जून २०१६पासून ते कोल्हापूरच्या डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत.
“वैद्यकीय शिक्षणाचे आंतरराष्ट्रीयीकरण” या विषयावरील मतांचे आदान-प्रदान करण्यासाठी डॉ. शर्मा यांनी आफ्रिकन महाद्वीपमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवास केला आहे. त्यांनी १९९८ ते २०१२ या कालावधीत मानवी वर्तनावर संशोधन करणाऱ्या स्वतंत्र समितीचे सदस्य म्हणून काम केले आहे. विविध राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय संस्थांनी हाती घेतलेल्या दोनशेहून अधिक क्लिनिकल संशोधन प्रकल्पांच्या पुनरावलोकन, मंजुरी आणि देखरेख प्रक्रियेत ते सहभागी होते. विविध व्यावसायिक आणि परोपकारी संस्थांचे ते सक्रिय सदस्य आहे, त्यांचे एक पुस्तक प्रकाशित झाले असून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय जर्नल्समध्ये २६ वैज्ञानिक लेख प्रकाशित केले आहेत.
प्रतिष्ठित नॅशनल अकॅडमी ऑफ मेडिकल सायन्सेसचे सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारत सरकारची ही नोडल एजन्सी राष्ट्रीय आरोग्य धोरण आणि नियोजन संबंधित बाबींमध्ये सरकारची सल्लागार संस्था म्हणून काम करते आणि वैद्यकीय आणि आरोग्य व्यावसायिकांसाठी वैद्यकीय शिक्षण चालू ठेवण्यासाठी प्रोत्साहन देणारी एजन्सी म्हणून कार्य करते. राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये प्रतिनिधी म्हणून, आमंत्रित शिक्षक आणि अध्यक्ष अशा विविध रूपांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता.
संशोधन व विकासावर भर: डॉ. शर्मा
आयसीएमआरच्या नियामक मंडळावर आपली निवड होणे हा डी. वाय. पाटील विद्यापीठाचा मोठा सन्मान आहे. डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल यांचा या यशामध्ये मोठा वाटा आहे. संस्थेचे उपाध्यक्ष गृहराज्य मंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, प्र-कुलगुरू डॉ. शिम्पा शर्मा यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले. देशाच्या वैद्यकीय धोरण प्रक्रियेत सहभागी होता येईल याचा मोठा आनंद आहे. या मंडळावरील अन्य सदस्यांचे मार्गदर्शन व सहाय्याचा फायदा डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पीटल व रिसर्च सेन्टरच्या माध्यमातून कोल्हापुरकराना कसा होईल यावर आपला भर असेल. आयसीएमआरच्या माध्यमातून संशोधन विषयक कामाला अधिक गती देण्यासाठी आपला प्रयत्न राहील अशी माहिती डॉ. राकेश कुमार शर्मा यांनी या निवडीनंतर दिली.