वन्यजीव व मानव संघर्ष टाळण्यासाठी रानमोडी तण निर्मूलन मोहीम राबवावी

Spread the love

• पर्यावरणप्रेमी संस्थांची मागणी
कोल्हापूर • प्रतिनिधी
     हत्ती, गवे, रानडुक्कर असे वन्यप्राणी नागरी वस्त्यांमध्ये येवून मानव व वन्यजीव संघर्ष वाढत आहे. तो संघर्ष टाळण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाय व लोकसहभागातून विविध प्रयत्न करण्याची गरज आहे. सध्या संपूर्ण जिल्हा हा रानमोडी या तणामुळे व्यापला असून त्याचे उच्चाटन करण्याची मोहिम शासनाने प्राधान्याने राबवावी अशी मागणी वनमंत्री, पर्यावरण मंत्री व सचिव यांसह मुख्यप्रधान वनसंरक्षक यांच्याकडे केली असल्याची माहिती वनस्पती तज्ञ प्रा.डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण अभ्यासक उदय गायकवाड आणि  अनिल चौगुले यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
     प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन दशकांपेक्षा अधिककाळ वन्यजीव नागरी वस्त्यांमध्ये येवू लागले आहेत. वन्यजीवांना आवश्यक असणारे अन्न, पाणी, आधिवास आदी योग्य प्रकारे उपलब्ध न झाल्याने असे प्रश्न निर्माण होत आहेत. कारवीच्या चार जाती, दोन बांबू जाती, सहा जातीची झुडपे, वृक्षांच्या तेरा जाती, पाच जातीचे गवत हे गव्यासारख्या प्राण्याचे अन्न आहे. अभयारण्य व जंगल परिसरात त्या पुरेशा असल्या तरी त्याच्या क्षेत्रात विदेशी रानमोडीसारखे तण वेगाने अतिक्रमण करीत आहे. त्याचे शास्त्रीय पद्धतीने निर्मूलन करणे गरजेचे आहे. याचबरोबर जंगलाचे क्षेत्र आणि त्या तुलनेत उन्ह्याळ्यात उपलब्ध होणारे पाणीसाठे खूपच कमी आहेत. जंगलाच्या कोअर भागात मानवी हस्तक्षेप मोठ्या प्रमाणात सुरू असून वन विभागाचे अधिकारी वन व्यवस्थापन करण्याऐवजी पर्यटन विकास करण्यात व्यस्त आहेत.
      गव्याना आवश्यक लोळी तयार करणे, क्षार पुरवणे, मानवी हस्तक्षेप टाळणे, आग व वणवे प्रतिबंधक कृती करणे, पाणीसाठे विकसित करणे, विदेशी रानमोडीसारख्या  अनावश्यक वनस्पतीचे निर्मूलन करणे, विस्थापित गावांच्या शेतजमीन व इतर पडजमिनीत आवश्यक स्थानिक खाद्य वनस्पतींची लागवड करणे असे प्रयत्न प्राधान्याने करावेत.
      यामध्ये लोक व विद्यार्थी सहभाग घेवून फूल व बी तयार होण्याआधी विदेशी रानमोडी वनस्पती काढण्याची मोहिम घेणे गरजेचे आहे. याबाबतीत विविध संस्था, संघटना पातळीवर काही प्रमाणात जनजागृती व कृती सुरू असून त्यास नागरिकांनी प्रतिसाद देवून सहभाग द्यावा असे आवाहन केले आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!