•
कोल्हापूर • प्रतिनिधी
मिरजकर तिकटी येथे मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्टवेळी ६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शहरामध्ये संचारबंदी आहे, परंतु अत्यावश्यक कामाच्या नावाखाली नागरीक गर्दी करत आहेत. त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी महापालिकेच्यावतीने मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात येत आहे. मिरजकर तिकटी येथे खरेदीसाठी आलेल्या व विनाकारण फिरणाऱ्या ६ नागरिकांची मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट करण्यात आली. यामध्ये एकूण १४९ नागरिकांची टेस्ट करण्यात आली. यामध्ये १४३ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले तर ग्रामीण भागातून व शहरातून आलेले ६ नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये पाचगांव व किणी वाठार येथील प्रत्येकी एक, गुजरी परिसरातील दोन, शिवाजी पेठ परिसरातील दोन नागरिकांचा समावेश आहे.
दोन दिवसात मोबाईल व्हॅनद्वारे रॅपिड ॲन्टीजन टेस्ट बिंदू चौक व लक्ष्मीपुरी येथे घेण्यात आली. यावेळी ७६ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यामध्ये ६ नागरीक पॉझिटिव्ह आढळले आहेत. या सर्व पॉझिटिव्ह नागरीकांना डीओटी सेंटरला व आज किणी वठार येथे सापडलेल्या नागरिकाला पारगांव येथील कोवीड सेंटरला ठेवण्यात आले आहे.
तरी नागरीकांनी मास्कचा वापर व सॅनिटाईजरचा वापर करणे आवश्यक आहे. अन्यथा अशा गर्दीच्या ठिकाणी हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी गर्दी टाळावी व गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलवडे केले आहे.