महावितरणकडून तब्बल २३०७५ मेगावॅटचा विक्रमी वीजपुरवठा

Spread the love


मुंबई :
     मागणीनुसार वीजपुरवठा करण्याचे आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढत उच्चांकी झेप घेत मंगळवारी (दि.८) महावितरणने विक्रमी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा पुरवठा केला आहे. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित भागात व महावितरणच्या कार्यक्षेत्रात आजवरच्या या सर्वाधिक मागणीप्रमाणे चोख नियोजनातून वीजपुरवठा करून महावितरणने वीजपुरवठ्याचा आजवरचा नवा विक्रमी टप्पा गाठला आहे. याआधी ९ मार्च २०२१ रोजी २२ हजार ३३९ मेगावॅट विक्रमी विजेचा पुरवठा करण्यात आला होता.
     राज्यात ऊन वाढून त्याच्या झळा हळूहळू वाढायला सुरवात झाली आहे. त्यामुळे विजेचा वापर वाढला आहे. सोबतच कृषिपंपांद्वारे विजेचा वापर देखील वाढला आहे. परिणामी गेल्या काही दिवसांपासून विजेच्या मागणीत सातत्याने वाढ सुरु आहे. यामध्ये मंगळवारी (दि. ८) राज्यात मुंबईसह तब्बल २५ हजार ९५५ मेगावॉट विजेची मागणी नोंदविण्यात आली. मुंबई वगळता राज्याच्या उर्वरित कार्यक्षेत्रात महावितरणकडून सुमारे २ कोटी ८१ लाख ग्राहकांना आजवरच्या उच्चांकी २३ हजार ७५ मेगावॅट विजेचा सुरळीत व अखंडित पुरवठा करण्यात आला. विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करताना राज्याच्या कोणत्याही भागात विजेचे भारनियमन करण्यात आले नाही, हे उल्लेखनीय.
      महावितरणच्या विक्रमी कामगिरीबद्दल राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत व ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी कौतुक करून अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनात आणि महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या नेतृत्वात विविध स्त्रोतांमधून उपलब्धतेचे नियोजन करीत विजेची ही विक्रमी मागणी पूर्ण करण्यात आली. महावितरणने आतापर्यंत केलेल्या वीज वितरण यंत्रणेचे सक्षमीकरण व विस्तारीकरणासोबतच दैनंदिन देखभाल व दुरुस्तीच्या कामाचे हे यश आहे. त्यामुळे तब्बल २३ हजार मेगावॅटपेक्षा अधिक क्षमतेच्या विजेचे वहन सध्या अस्तित्वात असलेल्या वीजयंत्रणेमधून शक्य झाले आहे.
      महावितरणने दीर्घकालीन वीजखरेदी करार असलेल्या वीजनिर्मिती कंपन्यांकडून त्यात सर्वात जास्त महानिर्मिती ६ हजार ८७४ मेगावॅट, एनटीपीसी व एनपीसीआयएलकडून एकूण ४ हजार १५४ मेगावॅट तसेच अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्लू, साई वर्धा, एम्पो या खासगी प्रकल्पांमधून ४ हजार ८५३ मेगावॅट वीज उपलब्ध झाली आहे. सोबतच नवीन व नवीकरणीय ऊर्जेच्या स्त्रोतांमधून सौर ऊर्जा- २३३५ मेगावॅट, पवन ऊर्जा- १६६ मेगावॅट तसेच सहवीजनिर्मिती प्रकल्पांतून १२०० मेगावॅट असे एकूण ३ हजार ९९१ मेगावॅट वीज उपलब्ध झाली. उर्वरित विजेची मागणी ही कोयना, घाटघर व इतर जलविद्युत प्रकल्पांतून १ हजार ३२० मेगावॅट वीजनिर्मिती करून तसेच मुक्त ग्राहक व रेल्वेच्या वीजनिर्मिती स्रोत्रातून १ हजार ३५३ मेगावॅट आणि पॉवर एक्स्चेंजमधून ६३० मेगावॅट विजेची खरेदी करून पूर्ण केली आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!