कोल्हापूर • प्रतिनिधी
कामगार मंत्रालयाच्या माध्यमातून बांधकाम कामगारांच्या विविध कल्याणकारी योजना राबवित आहे. एकही कामगार कल्याणकारी योजनांपासून वंचित राहणार नाही. बांधकाम कामगार नोंदणीच्या माध्यमातून सामाजिक क्रांती होईल, असा विश्वास ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केला.
कागलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगरमध्ये बांधकाम कामगारांना सुरक्षा साहित्यासह आरोग्य व शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप अशा संयुक्त कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे बोलत होते.
मंत्री श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून मूलभूत ग्रामीण विकासाची गंगा संपूर्ण महाराष्ट्रभर गावोगावी नेत आहे. येत्या वर्षात एकही काम शिल्लक राहणार नाही. ते पुढे म्हणाले, गेल्या २५ वर्षात जिथे सत्ता मिळाली, त्या सर्वच ठिकाणी सामान्य, दलित, कष्टकरी, गरीब माणूस नजरेआड होऊ दिला नाही. गरीब व सामान्य माणसांच्या अपेक्षा वेगळ्या असतात. सार्वजनिक कामापेक्षा तो व्यक्तिगत कामाला महत्त्व देत असतो. म्हणूनच गोरगरिबांच्या वैयक्तिक कल्याणाच्याही योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या. गोरगरिबांसाठी असलेली पेन्शन अडीचशे रुपयांवरून पाचशे, सहाशे व हजार रुपयांपर्यंत पोचवली. यापुढे ती दोन हजार रुपये करण्यासाठी प्रयत्नशील आहे. या योजनांसाठी असलेली २१ हजारांची उत्पन्न मर्यादा ५० हजारांपर्यंत करणार आहे.
केडीसीसी बँकेचे संचालक भैय्या माने, नगरसेवक चंद्रकांत गवळी माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, माजी नगराध्यक्ष अजित कांबळे, विक्रम कामत, तुषार भास्कर, रमेश कांबळे आदींची मनोगते झाली.
व्यासपीठावर नवाज मुश्रीफ, सौरभ पाटील, संजय चितारी, संग्राम लाड, बच्चन कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.
स्वागत नगरसेवक विवेक लोटे यांनी केले.