कोल्हापूर • प्रतिनिधी
अबूधाबी केमिकल्स डेरिव्हेटिव्ह कंपनी RSC लिमिटेड (ताजीझ) आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड (RIL) यांनी ताजीझ इडिसी आणि पीव्हीसी प्रकल्पासाठी औपचारिक भागधारक करारावर स्वाक्षरी केली. भागधारक करार $2 अब्ज किमतीचा आहे. ताजीझ इंडस्ट्रियल केमिकल्स झोन, रुवाईसमध्ये हा संयुक्त उपक्रम उभारला जाणार आहे.
ताजीझ इडिसी आणि पीव्हीसी संयुक्त उपक्रम क्लोर-अल्कली, इथिलीन डायक्लोराईड (EDC) आणि पॉलीविनाइल क्लोराईड (PVC) साठी उत्पादन सुविधा तयार करेल आणि ऑपरेट करेल. संयुक्त अरब अमिरातीमध्ये प्रथमच अशा प्रकारच्या रसायनांची निर्मिती केली जाणार आहे. यामुळे स्थानिक उत्पादकांसाठी उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतील.
रिलायन्सचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी ADNOC मुख्यालयाच्या भेटीदरम्यान औपचारिक भागधारक करारावर स्वाक्षरी केली. अंबानी यांनी महामहिम डॉ. सुलतान अल जाबेर, यूएईचे उद्योग आणि प्रगत तंत्रज्ञान मंत्री आणि ADNOC व्यवस्थापकीय संचालक आणि समूह सीईओ यांची भेट घेतली आणि हायड्रोकार्बन मूल्य साखळी, नवीन ऊर्जा आणि डीकार्बोनायझेशनमधील भागीदारी आणि वाढीच्या संधींवर चर्चा केली.
याबाबत मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ताजीझमधील संयुक्त उपक्रमाची जलद प्रगती पाहून मला खूप आनंद झाला आहे. हा संयुक्त उपक्रम भारत आणि युएईमधील मजबूत संबंधांचा साक्षीदार आहे. युएईला मुक्त व्यापाराचा फायदा होईल. यावर्षी फेब्रुवारीमध्ये या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यामुळे दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापाराला चालना मिळणार आहे.
डॉ.अल जाबेर म्हणाले, रिलायन्स हा एक महत्त्वाचा धोरणात्मक भागीदार आहे आणि ताजीझमधील आमचे सहकार्य युएई आणि भारत यांच्यातील सखोल आणि मैत्रीपूर्ण संबंध अधिक दृढ करेल. ते औद्योगिक आणि ऊर्जा सहकार्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल.
मुकेश अंबानी यांनी नूतनीकरणक्षम ऊर्जा आणि ग्रीन हायड्रोजनमध्ये सहकार्याच्या संभाव्य संधी शोधण्यासाठी मसदारचे सीईओ मोहम्मद जमील अल रामही यांचीही भेट घेतली. नवीन ऊर्जा ही युएई आणि भारत या दोन्ही देशांच्या प्राथमिकतांपैकी एक आहे.