कोल्हापूर • प्रतिनिधी
१९७९ साली जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे यांची कोल्हापूर शाखा विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर करवीरनगर वाचन मंदिर येथील वास्तूत सुरू झाली. त्यानंतर १९९८ साली ही कोल्हापूर शाखा १४३६ सी वॉर्ड, सुभाष रोड लक्ष्मीपुरी कोल्हापूर येथे स्थलांतरित झाली. गेली ४२ वर्षे बँकेच्या सभासद, ग्राहक आणि हितचिंतक यांच्या मोलाच्या आणि भक्कम सहकार्य तसेच सहभागाच्या पाठबळावर कोल्हापूर शाखेचा सुमारे रु. तीनशे कोटी इतका एकूण व्यवसाय आहे. ग्राहकांना अधिक उत्कृष्ट ग्राहक सेवा देण्याच्या उद्देशाने जनता बँकेची कोल्हापूर शाखेचे “श्रीपद्मलक्ष्मी”, ७४२ ई वॉर्ड, सुभाष फोटो ग्राफिक्सशेजारी, ३ री गल्ली, शाहूपुरी, कोल्हापूर येथील प्रशस्त आणि सुसज्ज जागेत सोमवारी (दि.२) स्थलांतर झाले.
यानिमित्ताने शाखेत गणेशपूजन आणि वरुण पूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. याप्रसंगी बँकेचे संचालक विद्यानंद देवधर, किशोरभाई शहा, रा.स्व.संघ मा. विभाग संघचालक प्रतापसिंह तथा अप्पा दड्डीकर, शाखा व्यवस्थापक निलेश देशपांडे, शेअरहोल्डर्स रिलेशन कमिटी सदस्य, ग्राहकसेवा समितीचे सदस्य आणि बँकेचे सभासद, ग्राहक, हितचिंतक व बँकेचा सर्व सेवक वर्ग उपस्थित होते.
थोडक्यात बॅंकेविषयी…..
जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे यांच्या महाराष्ट्र व गुजरात या दोन राज्यात मिळून एकूण ७२ शाखा व २ विस्तारित कक्ष आहेत. बँकेचे स्वतःचे आय.एस.ओ. प्रमाणित अद्यावत डाटा सेंटर व डिझास्टर रिकवरी साईट आहे. जनता बँकेमध्ये कोअर बँकिंग सुविधा उपलब्ध असून ए.टी.एम., इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग,आय. एम. पी. एस., यु.पी.आय, भारत बिल पेमेंट इत्यादी तंत्रज्ञानावर आधारित सेवा सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय बँकेमध्ये नेहमीच्या ठेव व कर्ज योजना व्यतिरिक्त लॉकर,डिमॅट सुविधा, ई इन्शुरन्स, म्युच्युअल फंड,जीवन विमा, आरोग्य विमा, जनरल इन्शुरन्स, प्रधानमंत्री जीवनज्योती आणि प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना इत्यादी सुविधा एकाच छताखाली उपलब्ध आहेत.