विशाळगडावरील अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार: सुनील घनवट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      विशाळगडावरील ‘रेहान बाबा’ दर्ग्याला शासकीय निधी मिळतो. येथील मंदिरे अन् बाजीप्रभूंच्या स्मारकांची पडझड झाली आहे.
विशाळगडावर झालेली इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचा अपमान असून ही अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार असल्याचे ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ता सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
     दरम्यान, बुधवारी (दि.१७) जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन अतिक्रमणाविषयी सविस्तर माहिती दिली जाणार आहे. दि.१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी बारा वाजता घंटानाद करण्यात येणार असल्याचे सुनील घनवट यांनी सांगितले.
    सुनील घनवट म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेले गडकोट हे महाराष्ट्राचा ऐतिहासिक ठेवा आहेत. तेथील विविध स्मारके ही पराक्रमाची साक्ष देणारी प्रेरणास्थाने आहेत. हिंदवी स्वराज्याचा वारसा असणार्‍या या गडकिल्ल्यांसाठी अनेक शूरवीर मावळ्यांनी रक्त सांडले. या गडकिल्ल्यांवर गेल्यावर आजही आपल्या पराक्रमी इतिहासाचा अभिमान वाटून उर भरून येते. अशांपैकीच एक असलेला म्हणजे विशाळगड ! ३५० वर्षांनंतरही ऊन, वारा, पाऊस आणि मानवी आक्रमणे यांना तोंड देत आजही उभा आहे; मात्र शिवछत्रपतींचा हा अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे आज दुरावस्थेत आहे. या गडावर ६४ हून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता आहे, दर्ग्याचे आर.सी.सी. बांधकाम झाले आहे. हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. हे षडयंत्र आम्ही कदापि सहन करणार नाही. विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणे ही छत्रपती शिवरायांचाच अपमान असून ही अतिक्रमणे त्वरित न हटवल्यास याविरोधात राज्यव्यापी आंदोलन कृती समितीच्यावतीने छेडणार आहे.
    पत्रकार परिषदेला कृती समितीचे संभाजीराव भोकरे, मलकापूर येथील  चारुदत्त पोतदार, शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, प्रमोद सावंत, किशोर घाटगे, रमेश पडवळ, हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ता समीर पटवर्धन, कृती समितीचे समन्वयक  किरण दुसे आणि हिंदु जनजागृती समितीचे बाबासाहेब भोपळे उपस्थित होते.
         कृती समितीच्या मागण्या …..
      वर्ष १९९८ पूर्वी ज्या नोंदी शासनाकडे आहेत, केवळ त्याच ग्राह्य धरून उर्वरित सर्व बांधकामे आणि अतिक्रमणे एका महिन्याच्या आत शासनाने काढून टाकावीत. या प्रकरणी आजपर्यंत विशाळगडावर झालेले अतिक्रमण, मंदिरे-समाध्यांची दुरावस्था याला कारणीभूत असणार्‍या पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करावी.
     गडावरील अतिक्रमणे जोपर्यंत पूर्णपणे हटत नाहीत, तोपर्यंत पुरातत्व खात्याच्या अधिकार्‍यांनी विशाळगडाला सप्ताहातून एकदा भेट द्यावी आणि तेथील अहवाल पारदर्शीपणे शासनाला सादर करावा.
    पन्हाळा ते विशाळगड हा रणसंग्राम लोकांसमोर येण्यासाठी याचे एक ऐतिहासिक स्मारक उभारण्यात यावे. तसेच गडाच्या पायथ्यापासून गडाच्या टोकापर्यंत असणारी सर्व मंदिरे, धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे यांचे महत्त्व सांगणारे फलक जागोजागी लावावेत.
      गडाचे पावित्र्य भंग करणार्‍या गोष्टींवर (उदा. मद्यपान, मांसविक्री) तसेच आरोग्यास हानी पोचवणार्‍या सर्वच गोष्टींना प्रतिबंध करावा. पर्यटकांच्या गडावरील निवासव्यवस्थेमुळे अनेक अयोग्य गोष्टी होतात, त्यांना प्रतिबंध घालण्यासाठी सर्व पर्यटकांची निवासव्यवस्था गडाच्या पायथ्याशी करावी.
      गडाची ग्रामदेवता असणार्‍या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरुस्ती आणि जीर्णोद्धार करण्यात यावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!