कोल्हापूर • प्रतिनिधी
‘स्वच्छता हीच सेवा’ हा मूलमंत्र महावितरणच्या कोगे शाखा कार्यालयाने जपला आहे. ग्राहक सेवेतील तत्परतेसह परिसर स्वच्छ सुंदर ठेवण्याकडे कनिष्ट अभियंता आर. एस. कांबळे यांचा कटाक्ष आहे. शाखा व उपकेंद्र कार्यालय इमारतीची दुरूस्ती व रंगरंगोटीचे कामही पाठपुरावा करून पुर्ण केले आहे. त्यामुळं या कार्यालयाच रूपडं पालटलं. आता वाह …! अशी दाद कार्यालयात येणारा ग्राहक आपसूकच देऊन जातो.
महावितरणच्या कोल्हापूर ग्रामीण विभागाअंतर्गत फुलेवाडी उपविभागास कोगे शाखा कार्यालय संलग्न आहे. कोगे, बहिरेश्वर, महे, बीड या चार गावातील ३ हजार ७६५ ग्राहकांना वीज सेवा देण्याची जबाबदारी हे शाखा कार्यालय पार पाडीत आहे. यंत्रचालक पदी कार्यरत असताना अभियांत्रिकीचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असल्याने कनिष्ठ अभियंता पदी कामाची संधी आर. एस. कांबळे यांना प्राप्त झाली. त्यांनी अल्पावधीतच आपल्या प्रयोगशील स्वभावातून अनेक बदल घडवून आणले आहेत.
त्यांनी सहकाऱ्यांच्या माध्यमातून ११ केव्ही बहिरेश्वर फीडरवरील झाडांच्या फांद्याच्या छाटणीचे काम प्राधान्याने पूर्ण करून घेतले. त्यामुळे पुर्वी वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आता सुरळीत सुरू आहे. कोगे शाखा कार्यालयाकडून ग्राहकांशी सुसंवाद, ग्राहकांना वीजजोडणी, ग्राहकांच्या वीज विषयक समस्यांची सोडवणूक ही कामे योग्यपणे सुरू असल्याचे स्थानिक ग्राहकांच्या समाधानकारक प्रतिक्रिया सांगून जातात.
कोगे कक्ष व उपकेंद्राच्या दुरूस्तीसह रंगरंगोटीचे काम स्थापत्य विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रवीणकुमार थोरात यांनी पूर्ण करून घेतले.