कोल्हापूर • प्रतिनिधी
शहरांतर्गत सर्व कोव्हीड केंद्र व खाजगी रुग्णालयात स्थानिकांना जागा राखून ठेवा तसेच दुधाळीसह विभागीय कोव्हीड केंद्रे सुरू करा, अशी मागणी शिवसेना शाखा शुक्रवार पेठ – उत्तरेश्वर पेठच्यावतीने किशोर घाटगे यांनी महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे. या सर्व रुग्णांना अत्याधुनिक योग्य उपचार मिळावेत व रुग्ण बरे व्हावेत यासाठी प्रशासनासह आरोग्य यंत्रणा आटापिटा करत आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या पाहिली तर जिल्ह्याबाहेरील उपचार घेणाऱ्यांच्या रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. ५० टक्के खाजगी हॉस्पिटलचे व्हेंटिलेटर बेडवर परराज्यातील रुग्ण उपचार घेत आहेत. कर्नाटक शासनाने लॉकडाऊन जाहीर केला असून गेल्या महिनाभर महाराष्ट्रातील लोकांमुळे प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सीमेवरील गावागावात चर खणले आहेत पण कोरोनाच्या पहिल्या लाटेतसुद्धा आणि आतासुद्धा मोठ्या प्रमाणात कर्नाटकसह लगतच्या परजिल्ह्यातील कोरोना रुग्ण कोल्हापूर शहर व जिल्ह्यात येत असून माणुसकीच्या दृष्टीने आपण त्यांचेवर उपचार करत आहोत पण शहरात रुग्ण संख्या वाढत असून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी विभागीय दुधाळी, फुलेवाडी, गांधी मैदान, राजेपाध्येनगर, कसबा बावडा या सर्व विभागात ऑक्सीजन बेड असलेली प्रशिक्षित डॉक्टर स्टाफसह अत्याधुनिक कोव्हीड सेंटर त्वरित सुरू करावीत व शहरातील सर्व खाजगी व महापालिकेच्यावतीने सुरू असणाऱ्या कोव्हीड सेंटरमध्ये स्थानिक रुग्णांना प्राधान्याने उपचार करण्यासाठी खाटा राखीव ठेवाव्यात. शहरातील एकाही कोरोना रुग्णाची बेडआभावी हेळसांड होऊ नये, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने किशोर घाटगे यांनी केली.
यावेळी प्रशासक डॉ. बलकवडे यांनी स्थानिक कोरोना रुग्णांना प्राधान्याने उपचार देण्याचा सूचना संबंधितांना देऊन योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी सुरेश कदम, रियाज बागवान, सनी अतिग्रे, राकेश पोवार, अनंत पाटील उपस्थित होते.
———————————————–