• १२ वी नंतर स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेणारी राज्यातील पहिलीच ॲकॅडमी कोल्हापूर • प्रतिनिधी पुणे येथे जाऊन प्रशासकीय अधिकारी व्हायचे स्वप्न पूर्ण करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना आता तेच स्वप्न कोल्हापुरात राहून सत्यात उतरवता येणार आहे. संजय घोडावत विद्यापीठात नुकतीच एमपीएससी व बँकिंग या स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रेसिडेन्शल स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीची सुरुवात करण्यात आली आहे. खरे तर विद्यार्थी पदवी शिक्षण घेतल्यानंतर स्पर्धा परीक्षांकडे वळतात आणि तसेच प्रशासकीय अधिकारी व्हायला उशीर लागतो. त्यामुळे स्पर्धा परीक्षेची मूलभूत तयारी १२ वी नंतरच सुरु व्हावी जेणेकरून पदवी शिक्षण संपल्यावर स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे सोपे जाईल, या उद्देशाने या निवासी ॲकॅडमीची स्थापना करण्यात आली आहे. या ॲकॅडमीमध्ये बी.ए., बी.कॉम, बीएस्सी तसेच बी.बी.ए. करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एमपीएससी, बँकिंग आणि एस.एस.सी. स्टाफ सिलेक्शन इत्यादी स्पर्धा परीक्षांची तयारी पदवीच्या प्रथम वर्षापासूनच करून घेतली जाणार आहे. तसेच सर्टिफाइड टायपिंग, संगणक कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य, स्पोकन इंग्लिश यामाध्यमातून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे देखील लक्ष देण्यात येणार आहे. याशिवाय कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांना राहायला प्रशस्त वसतिगृह, भोजन व्यवस्था, सिक्युरिटी इत्यादी सोयीसुविधा उपलब्ध आहेत. तसेच इनडोअर-आऊटडोअर गेम्स, शारीरिक सराव करण्यासाठी प्रशस्त ग्राऊंड आहे. याव्यतिरिक्त प्रशासकीय सेवेतील तज्ज्ञ अधिकाऱ्यांकडून विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन दिले जाणार आहे. यासोबतच विद्यार्थ्यांसाठी अभ्यासदौरे आयोजित केले जाणार असून प्रत्यक्ष भेटीतून ज्ञानार्जन करता येणार आहे. या ॲकॅडमीचे संचालक म्हणून प्राचार्य विराट गिरी हे काम पाहत आहेत. याबाबत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले म्हणाले की, सांगली, कोल्हापूर, सातारा भागातील विद्यार्थी पुणे येथे जाऊन स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. त्यामुळे या स्पर्धा परीक्षा तयारीचे व्यासपीठ आम्ही कोल्हापूर येथे त्यांना उपलब्ध करून देत आहोत, तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन देखील त्यांनी केले. ——————————————————-