व्यापारी-उद्योजकांचे कर्जाचे पुनर्गठन व व्याजात सवलत द्यावी: जिल्हाधिकारी

Spread the love

• विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांसमवेत दोनच दिवसात बैठक
कोल्हापूर • प्रतिनिधी
     महापुरामुळे नुकसानीत आलेल्या व्यापारी-उद्योजकांच्या कर्जाचे पुनर्गठन बँकांनी करून द्यावे व जास्तीत जास्त व्याज सवलत द्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केल्या. वेस्टर्न महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या नेतृत्वाखाली भेटलेल्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अग्रणी बँक व्यवस्थापक राहुल माने यांना सुचना दिल्या.
     पूरग्रस्त भागातील सहा जिल्ह्यातील व्यापारी-उद्योजकांना सवलतीत नवीन भांडवल उपलब्ध व्हावे तसेच विमा क्लेम लवकर मिळावेत यासह विविध मागण्यांसाठी ललित गांधी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन दिले आहे. त्याअनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी-उद्योजकांच्या कर्ज, विमा, लॉकडाऊन या विषयांवर चर्चा करण्यासाठी शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेतली.
      यावेळी झालेल्या बैठकीप्रसंगी ललित गांधी यांनी या आघातातून सावरण्यासाठी व्यापारी – उद्योजकांना त्यांच्या नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई देणे आवश्यक असल्याचे सांगून सविस्तर चर्चा केली. जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी विमा कंपन्यांच्या क्लेमसंबंधी एक-दोन दिवसातच बैठक घेऊन विमा कंपन्यांच्या अधिकार्‍यांना आवश्यक त्या सुचना दिल्या जातील असे आश्‍वासन दिले. तसेच बँक कर्ज व व्याज विषयींच्या सवलती या राष्ट्रीयकृत व खाजगी बँकांप्रमाणेच सहकारी बँकातून घेतलेल्या कर्जासाठीही मिळाव्यात यासाठी राज्य शासनाकडे शिफारस करू असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे.
     शिष्टमंडळात चेंबर ऑफ कॉमर्सचे मानद सचिव जयेश ओसवाल, प्रतिक चौगुले, रणजित पारेख, प्रशांत पाटील, निलेश शहा, जयंत गोयाणी, दिपक केसवानी, मनोज बहिरशेठ, दर्शन गांधी, अमित लोंढे, शाम बासराणी आदि विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. त्यांनी विविध समस्या जिल्हाधिकार्‍यांच्यापुढे सादर केल्या तसेच विकेंड लॉकडाऊन रद्द करावा व दुकानाच्या वेळा रात्री ९ पर्यंत वाढवाव्यात अशीही मागणी यावेळी केली.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!