केंद्रीय आरोग्य पथकाकडून जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेचा आढावा

Spread the love


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
      वाढत्या कोरोना रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर डॉ. प्रदीप आवटे, राज्य सर्वेक्षण अधिकारी, डॉ. प्रणील कांबळे (उपसंचालक) प्रादेशिक कार्यालय आरोग्य व कुटुंब कल्याण (पुणे) आणि एम्स हॉस्पिटलचे (नागपूर) पल्मनरी विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. सत्यजित साहू यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय आरोग्य पथकाने आज जिल्हाधिकारी कार्यालयातील राजर्षी शाहूजी सभागृहात आरोग्य व्यवस्थेचा दिर्घ आढावा घेतला.
     या आढावा बैठकीत मार्गदर्शन करताना डॉ. आवटे म्हणाले, येथील नागरिकांचे वेगाने लसीकरण करण्यात यावे. लसीच्या उपलब्धतेसाठी राज्य पातळीवर, केंद्राकडे पाठपुरावा सुरु आहे. येथील पूर परिस्थिती पाहता संबंधित गावातील नागरिकांच्या १०० टक्के लसीकरणाला प्राधान्य देण्यात यावे. त्याचबरोबर वयोगटानुसार लसीकरण केले गेले पाहिजे. क्राऊड मॅनेजमेंट (गर्दी व्यवस्थापन) मेंटेन करा. लसीकरण झालेल्या नागरिकांचे आरोग्य यंत्रणेकडून विश्लेषण करण्यात यावे. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने पूर्व तयारी करण्यात यावी. तसेच कोवीडमध्ये काम करणाऱ्या ज्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचे वेतन थकले आहे. त्यांची यादी पथकाला द्यावी अशी सूचना डॉ. आवटे यांनी केली.
     तर पॉझिटीव्हीटी दर कमी येण्यासाठी आरोग्य विभागाने सुक्ष्म नियोजन करावे अशी सूचना डॉ. कांबळे यांनी केली.
     प्रारंभी जिल्ह्यातील कोविड आजार, रुग्ण व उपचार व्यवस्थेसंदर्भात जिल्ह्या आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी तर मनपा क्षेत्रातील कोविड संदर्भात आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी माहिती देवून लस वाया जाऊ नये, तसेच लसीचा पूरेपूर वापर व्हावा यासाठी नियोजन सूरु असल्याचे सांगितले.
     आरोग्य यंत्रणेकडून दररोज ५० हजार नागरिकांचे लसीकरण करण्याची तयारी आहे. मात्र पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध होत नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध झाल्यास कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येला आळा बसेल असा आशावाद प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला.
     सध्या उपलब्ध होत असलेल्या लसीपैकी ९० टक्के लस ही दुसऱ्या डोससाठी तर १० टक्के लस ही नव्याने डोस घेणाऱ्यासाठी देण्यात येत असल्याची माहिती जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.
     लसीकरणामध्ये राज्यात कोल्हापूर जिल्ह्याने आघाडी घेतल्याबद्दल केंद्रीय आरोग्य पथकाने समाधान व्यक्त केले. या पथकाकडून जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण, डेथ ऑडीट, एकूण, लसीकरण, पूरस्थितीतील संभाव्य आरोग्य व्यवस्था, ऑक्सीजन स्थिती, तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने प्रशासनाकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजना, टेस्टींग (RAT/RTPCR), म्युकर मायकोसिस, कंटेनमेंट झोन (प्रतिबंधित क्षेत्र) आदींच्या आढावा यावेळी घेण्यात आला.
     या बैठकीसाठी नूतन जिल्हाधिकारी राहूल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, अपर जिल्हाधिकारी किशोर पोवर, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल माळी, अधिष्ठता डॉ. एस. एस. मोरे, ग्रामीण विकास यंत्रणेचे रवी शिवदास, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (जि. प.) मनीषा देसाई, क्षयरोग अधिकारी डॉ. उषादेवी कुंभार, डॉ. फारुक देसाई यांच्यासह इतर आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!