पुरातत्व खात्याला जाग येण्यासाठी घंटानाद आंदोलन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पुरातत्व खात्याला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्यावतीने शुक्रवारी घंटानाद आंदोलन करण्यात आले. 
विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी  विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ता सुनील घनवट यांनी केली.
     शिवछत्रपतींचा विशाळगडरूपी असलेला अमूल्य ठेवा राज्याचे पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे दुरावस्थेत आहे. गडावर ६४ ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे झाली आहेत. गडांवरील प्राचीन मंदिरे पडझड झालेली आणि मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधी अत्यंत दुर्लक्षित आहेत. छत्रपती शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांची समाधीही अत्यंत दुर्लक्षित आहे. याउलट गडावर रेहान बाबा दर्ग्याच्या परिसराच्या सुशोभिकरणासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे, तेथे जाण्यासाठी पेव्हर ब्लॉकचा रस्ता आहे, दर्ग्याचे आर.सी.सी. बांधकाम झाले आहे. तरी विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवून; दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करा अन् गडावरील ऐतिहासिक स्मारके, विविध नरवीरांच्या समाधी अन् मंदिरे यांचा कालमर्यादा ठेवून जिर्णोद्धार करा, अशी मागणी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ता सुनील घनवट यांनी केली.  
     पुरातत्व खात्याला जाग येण्यासाठी विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात घंटानाद आंदोलन करण्यात आले. त्यावेळी त्यांनी ही मागणी केली. याच मागणीसाठी राज्यभर ‘ऑनलाईन’ आंदोलनही करण्यात आले. यावेळी ‘विशाळगडावरील अतिक्रमण रोखा, शिवकालीन इतिहासाचे जतन करा’ ‘विशाळगड अतिक्रमण मुक्त करा’ ‘अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करणार्‍या पुरातत्व खात्याचा धिक्कार असो’ अशा घोषणांनी छत्रपती शिवाजी महाराज चौक दणाणून गेला.
     किरण दुसे यांनी प्रास्ताविक केले. यानंतर विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे सदस्य तसेच शिवसेना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, श्री महालक्ष्मी भक्त समितीचे प्रमोद सावंत, शिवसेनेचे किशोर घाडगे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह सुरेश यादव, शिवसेनेचे संभाजीराव भोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी हिंदु एकता आंदोलनाचे  चंद्रकांत बराले, बापू वडगावकर, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे विजय आरेकर, ग्राहक संरक्षण सेनेचे तालुकाप्रमुख दीपक यादव, रामभाऊ मेथे, धनंजय यादव, किरण पाटील, आदित्य कराडे, प्रणव साळुंखे, उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *