कोल्हापूर • प्रतिनिधी
पुणे – बेंगलोर महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे कागल ते निपाणी हा मार्ग प्रवासासाठी बंद करण्यात आला होता. त्यामुळे या महामार्गावर अडकलेल्या ट्रक चालकांची जेवणाची व्यवस्था आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली. यामुळे कोल्हापूरकरांच्या दातृत्वाचा आणि मदतकार्याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.
कोल्हापुरात गेले दोन दिवस प्रचंड पाऊस झाल्याने जिल्ह्यात महापूर आला. यामुळे महामार्गावरही ठीकठिकाणी पाणी आले आहे. निपाणी ते कागल या दरम्यान पाणी आल्यामुळे कागलपासून पुढे जाणारी सर्व वाहने रोखण्यात आली होती. यामुळे या महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. यामध्ये प्रामुख्याने मालवाहतूक करणाऱ्या पाचशेहून अधिक ट्रकचा समावेश होता. अचानक थांबावे लागल्यामुळे ट्रक चालकांच्या जेवणाचा प्रश्न निर्माण झाला होता.
आमदार ऋतुराज पाटील यांना ही गोष्ट समजताच त्यांनी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्याशी संपर्क साधून चालकांच्या जेवणाची व्यवस्था करण्याबद्दल सूचना केली. त्यानंतर श्री. खोत आणि त्यांच्या ५० हून अधिक सहकाऱ्यांनी ट्रक चालकांच्या जेवणाची व्यवस्था केली. यामुळे हे परप्रांतीय चालकसुद्धा भारावून गेले.