रस्ते अपघात कमी होण्यासाठी प्रबोधन करुया: पालकमंत्री सतेज पाटील


कोल्हापूर  (जिल्हा माहिती कार्यालय) 
     रस्ते अपघात कमी होण्यासाठी आणि मृत्यू रोखण्यासाठी सर्वांनी मिळून प्रबोधन करुया. महिनाभर अभियान राबविण्यापेक्षा रस्ता सुरक्षा जीवन रक्षा अभियान वर्षभर राबवू आणि स्वयंशिस्त लावू या, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.
     सडक सुरक्षा जीवन रक्षा ३२ व्या राष्ट्रीय सुरक्षा अभियानाचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते आणि खासदार प्रा. संजय मंडलिक यांच्या हस्ते प्रबोधन फलक गॅलरीचे उद्घाटन आज करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी दौलत देसाई, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, विभाग नियंत्रक रोहन पलंगे आदी उपस्थित होते.
     पालकमंत्री श्री. पाटील पुढे म्हणाले, रस्ता सुरक्षा सप्ताहावरुन पंधरवडा आणि आता महिनाभर अभियान राबविण्यात येत आहे. मागील वर्षी देशात साडेचार लाख अपघात झाले आहेत. त्यामध्ये दिडलाख मृत्यू झाले आहेत. म्हणजे दिवसाला ४१४ लोकांचा मृत्यू देशात होत आहेत. वाहन परवाना देतानाच कडक नियमांची अंमलबजावणी करा. त्याचबरोबर प्रबोधन, जनजागृती यावर सर्वांनीच भर द्यायला हवा. अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी स्वत:लाच शिस्त लावून घ्यायला हवी.
      राज्यातील केंद्रासाठी १३६ कोटी मंजूर करण्यात आले आहेत. त्यापैकी मोरेवाडी येथील केंद्रासाठी १३ कोटी मंजूर झाले  आहेत. असे सांगून पालकमंत्री म्हणाले, महिनाभरात मोरेवाडी येथील तपासणी व प्रमाणपत्र केंद्राच्या कामास सुरुवात होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील झालेल्या अपघातांबाबत विश्लेषणात्मक अहवाल तयार करावा. झालेल्या अपघातांची कारणे काय आहेत. सीट बेल्ट न वापरणारे किती अपघात, अपघातात विद्यार्थ्यांची संख्या किती याबाबत सविस्तर अहवाल प्रादेशिक परिवहन विभागाने सादर करावा. हा अहवाल राज्याला सादर करु. यातून निश्चितच पुढील उपाययोजनांसाठी मदत होईल.
खासदार श्री. मंडलिक यावेळी म्हणाले, वाहतुकीचे नियम पाळण्यासठी प्रबोधनात्मक प्रादेशिक परिवहन विभागाने परिसरातील भिंती बोलक्या केल्या आहेत. रस्ता सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकेची निर्मिती केली आहे. याच पध्दतीने आपण सर्वांनी जनजागृती करण्यासाठी प्रयत्नशिल राहू या. महामार्गावर सुरक्षितपणे वाहतूक करता यावी, असे महामार्ग बनविण्यासाठी आम्ही प्रयत्नशिल आहोत.
     यावेळी जिल्हाधिकारी  दौलत देसाई व पोलीस अधीक्षक श्री. बलकवडे व प्रादेशिक परिवहन अधिकारी डॉ. स्टिव्हन अल्वारिस तसेच  लॉरी असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
      रस्ता सुरक्षा विषयक जनजागृती माहिती पुस्तिका आणि स्टिकर्स प्रकाशन यावेळी उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले. मोटार वाहन निरीक्षक युनुस सय्यद यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन शुभदा हिरेमठ यांनी केले. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर यांनी सर्वांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *