पावसाने रस्ते गेले खड्डयात: अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाईची मागणी

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी      
     चार दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. ‘रस्त्यात खड्डे की खड्डयात रस्ता’ अशी बहुसंख्य रस्त्यांची अवस्था आहे. रस्त्यांवरील खड्डे व त्यातून बाहेर आलेली खडी यामुळे वाहनधारकांसह नागरिकांना त्रास होत आहे. या चार दिवसांच्या पावसात रस्ते खड्डयात जाण्यासाठी जबाबदार अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याकडे केली आहे. तसेच सर्व रस्त्यांची पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत माहिती घ्यावी, असेही प्रशासकांना ई-मेलव्दारे पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे.
      कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, केवळ चार दिवसांच्या पावसाने कोल्हापुरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. गेल्या वर्षभरामध्ये कोल्हापूर शहरातील जवळपास काही रस्त्यांचे पॅचवर्क व काही रस्ते नवीन करण्यात आले होते. २०१९च्या पावसाळ्यामध्ये शहरातील रस्त्यांची अतिशय दुरावस्था झाली होती. रस्ते शास्त्रीय पध्दतीने दुरूस्त केले नाहीत तर पावसाळ्यात रस्ते खड्डयात जातील, हे आम्ही त्यावेळी झालेल्या रस्त्यांचे कामासंदर्भात टेस्ट रिपोर्ट घ्यावा असे महापालिका शहर अभियंताना व विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांना  निवेदनाद्वारे सूचित केले होते. मात्र तरीही थातूरमातूर पध्दतीने रस्ते दुरुस्ती व नवीन रस्त्यांची कामे करण्यात आली. आज केवळ चार दिवसांच्या पावसात रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. ज्या ज्या ठिकाणी रस्ते नवीन व पॅचवर्क केले थातूरमातूर पध्दतीने दुरुस्त केले गेले होते, बरोबर त्याच ठिकाणी रस्ते उखडून खड्डयांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. परत एकदा नागरिकांनाच त्रास सहन करावा लागत आहे. आता पुन्हा एकदा या रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती केली जाईल जी पुढच्या महिन्यात परत उखडून येईल. यात करदात्यांच्या करांचे पैसे खड्डयात जात आहेतच शिवाय या खड्डेयुक्त रस्त्यावर प्रवास करताना नागरिकांनाच त्रास सहन करावा लागणार आहे. हुशार अधिकारी व कंत्राटदार आता या सगळ्यासाठी पावसाला जबाबदार धरून नामानिराळे होतील. जोपर्यंत अशा कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकलं जाणार नाही व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत यात सुधारणा होणे शक्य नाही. आपण स्वतः सर्व रस्त्यांची पाहणी करून कामाच्या दर्जाबाबत माहिती घेऊन खराब झालेले रस्ते त्वरित करण्यासंदर्भात योग्य ती प्रक्रिया राबवावी व गणेशोत्सवापूर्वी शहरातील सर्व रस्ते सुस्थितीत व खड्डेमुक्त होण्यासंदर्भात प्रयत्न करावेत.
     कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीच्यावतीने रमेश मोरे, अशोक पोवार, भाऊ घोडके, अजित सासणे, प्रमोद पुगावकर, चंद्रकांत पाटील, महेश जाधव, चंद्रकांत सूर्यवंशी, पप्पू सुर्वे, राजेश वरक, विनोद डुणूंग, लहुजी शिंदे यांनी मागणी केली आहे.
—————————————————— Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!