कोल्हापूर • प्रतिनिधी
डॉ. सायरस पुनावाला इंटरनॅशनल स्कूल अंतर्गत आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूटचा कॅडेट रोनित रंजन नायक याने केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षा २०२० एनडीएमध्ये सर्वाधिक गुण मिळवून देशात प्रथम येण्याचा मान मिळवला. त्याचबरोबर पंकेश मोठाभाऊ महाले (देशात १२वा), गौरव मोहन नाथ (देशात ८९ वा), चंदन पुंडलिक हरले (देशात ११५ वा), पवन सोमेश्वर निर्मल (देशात १७५ वा) या विद्यार्थ्यांच्या एनडीए परीक्षेतील नेत्रदीपक यशाने डॉ. सायरस पुनावाला स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे, असे संस्थेचे अध्यक्ष गुलाबराव पोळ यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
ते म्हणाले की, स्कूलच्या आर्मड फोर्सेस प्रीपरेटरी इन्स्टिट्यूट या विभागात भावी अधिकारी बनविण्याच्या हेतूने एनडीए व तत्सम परीक्षांची पूर्वतयारी करून घेतली जाते. लष्करी सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. स्कूलने दिलेल्या भौतिक सुविधांसह दर्जात्मक शिक्षणामुळे कॅडेट रोनित नायक व अन्य चार विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. कोल्हापुरातील विद्यार्थ्यांनीही आर्मी ऑफिसर क्षेत्रातही करिअर करावे.
पत्रकार परिषदेस कॅडेट रोनित नायक, स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ, संचालक डॉ. सरदार जाधव, एएफपीआयचे चेअरमन विश्र्वास कदम, संचालक मेजर चंद्रसेन कुलथे उपस्थित होते.