शाही दसरा सोहळा उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      करवीरनगरीत आज सायंकाळी सूर्यास्ताच्यावेळी पारंपरिकपणे ऐतिहासिक दसरा चौकात शाही दसरा सोहळा मोठ्या थाटात आणि उत्साहात संपन्न झाला. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांच्या हस्ते शमीपूजन झाले. यावेळी छत्रपतींच्या परिवारातील खासदार श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत मालोजीराजे  छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती व यशस्विनीराजे छत्रपती उपस्थित होते. 
     श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, श्रीमंत संभाजीराजे छत्रपती, श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती आणि यशराजराजे छत्रपती यांनी शमीपूजन  केल्यानंतर सोने लुटताच उपस्थित करवीरवासियांनी अपूर्व उत्साहात सीमोल्लंघन करुन सोने लुटले. यानंतर सर्वांनी एकमेकांना सोने (आपट्याची पाने) देऊन विजयादशमी – दसरा सणाच्या शुभेच्छा दिल्या.
     तत्पूर्वी करवीर निवासिनी श्री अंबाबाई –  महालक्ष्मी, जुन्या राजवाड्यातील तुळजाभवानी आणि गुरु महाराज यांच्या पालख्यांचे लवाजम्यासह आगमन झाले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे परंपरागत पध्दतीने ऐतिहासिक मेबॅक मोटारीतून दसरा चौकात आगमन झाले. यावेळी पोलीस विभाग व टी.ए. बटालियनच्या बँड पथकाने करवीर संस्थानचे गीत वाजवून त्यांचे स्वागत केले. दसरा महोत्सव समितीच्यावतीने शाही कुटुंबातील सदस्यांचे स्वागत करण्यात आले. शाही घराण्याच्या प्रथेप्रमाणे औक्षण केले. पारंपरिक पध्दतीने पुरोहितांच्या मंत्रोच्चारात विधीवत पूजा केल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. यानंतर कोल्हापूरच्या जनतेने उत्साहात सोने लुटले. यानंतर श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांच्यासह राजघराण्यातील सदस्य राजवाड्यावर परतत असताना नागरिकांनी त्यांना सोने दिले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दसऱ्याचा कार्यक्रम शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून संपन्न झाला.
      ऐतिहासिक दसरा चौकातील या सोहळयास पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संजय मंडलिक, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, दैनिक पुढारीचे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव,  महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, डॉ. संजय डी.पाटील आदींसह विविध विभागांचे मान्यवर पदाधिकारी, अधिकारी, पोलीस विभागाचे अधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते. कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत शाही दसरा सोहळा संपन्न झाला.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!