कोल्हापूर • प्रतिनिधी
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा हा लोकशाहीचा विजय आहे. त्यामुळे सर्व नियम पाळून गोकुळची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. मात्र आता स्थगिती मिळवण्यासाठी सत्ताधारी गटाने जागतिक न्यायालयात जाऊ नये असा टोला राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार बैठकीत लगावला. तर न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा असे आवाहनही पालकमंत्री सतेज पाटील यांनी यावेळी केले.
गोकुळच्या निवडणुकीची सुनावणी झाल्यानंतर राजर्षी शाहू शेतकरी आघाडीचे नेते पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील, माजी संचालक बाबासाहेब चौगुले याच्या उपस्थितीत पत्रकार बैठक घेतली.
या पत्रकार बैठकीत बोलतांना पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय आज झाला. गोकुळ दूध संघाची निवडणूक घेण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज झालेल्या सुनावणीत दिला. त्यासाठी ३५ ऐवजी ७० ठिकाणी मतदान बूथ तयार करण्याच्या कोर्टाने सूचना दिल्या आहेत. त्यामुळे आता ही निवडणूक व्यवस्थित पार पडेल, असा विश्र्वास पालकमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. तर आपल्या देशाने लोकशाहीचा स्वीकार केलेला आहे. लोकशाहीमध्ये निवडणुकीला महत्त्वाचे स्थान आहे. गोकुळमध्येही निवडणूक व्हावी हीच आमची भूमिका होती. न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मतदानकेंद्राची संख्या दुप्पट करून निवडणूक होणार आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा सत्ताधाऱ्यांनी मान राखावा आता स्थगिती मिळवण्यासाठी जागतिक न्यायालयात जाऊ नये, असा टोला नामदार सतेज पाटील यांनी विरोधकांना या पत्रकार बैठकीत लगावला.