कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना आयोजित राज्य निवड ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत नवव्या व निर्णायक फेरीअखेर साडेआठ गुण मिळवत मुलांमध्ये पुण्याच्या साहिल शेजळने तर मुलींच्या गटात नाशिकच्या प्रचिती चंद्रात्रेयने अजिंक्यपद पटकाविले.
मुलांच्या गटात १४३ खेळाडू तर मुलींच्या गटात ५१ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला होता. त्यापैकी ११६ आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडूंचा सहभागच स्पर्धेची काठिण्य पातळी दर्शवतो. अतिशय मानाच्या मानल्या जाणाऱ्या या विजेतेपदाच्या शर्यतीत अखेरच्या फेरीपर्यंत कमालीची चुरस या लढतींमध्ये अनुभवायला मिळाली. महाराष्ट्राचा गुणी खेळाडू व कँडिडेट मास्टर ओम कदम याला मुलांच्या गटात फक्त अर्ध्या गुणांच्या फरकाने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले तर मुलींच्या गटात प्रचिती व धनश्री खैरमोडे यांचे गुण एकसमान असल्याने त्यांनाही टायब्रेकरचे आंतरराष्ट्रीय निकष लावत प्रचितीला विजेतेपद तर धनश्रीला उपविजेतेपद देण्यात आले.
दोन्ही गटांतील प्रथम विजेत्या खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आले असून अठरा वर्षांखालील वयोगटासाठी ते महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील. त्याचबरोबर मुलांच्या व मुलींच्या राज्य निवड स्पर्धा गटातील प्रथम १५ खेळाडूंना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात येणार आहे.
यंदाची महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा पहिल्यापासूनच चर्चेत आहे, ती यातील वैविध्यपूर्ण बदलामुळे व ऑनलाइन घेतल्या जाणाऱ्या आधुनिक संकल्पनेमुळे. विशेष बाब म्हणजे यावर्षी प्रथमच मुलांच्या व मुलींच्या गटात एकसमान रोख बक्षिसांचा समावेश केला गेला आहे. राज्य संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ मयूर व सचिव निरंजन गोडबोले यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले व पंचांची भूमिका पार पाडणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले.
१८ वर्षांखालील वयोगट प्रथम १५ विजेते खेळाडू – मुले : साहिल शेजळ, ओम कदम, कैवल्य नागरे, क्षत्रिय वेखंडे, देवांश शाह, आर्यन शाह, विहान दावडा, वेदांत वेखंडे, कशीश जैन, अथर्व जैल, योहान बोरीचा, ऋषभ गोखल, प्रथमेश कषिश, ध्रुव हळदाणकर, जीत शहा.
विजेत्या खेळाडू – मुली : प्रचिती चंद्रात्रेय, धनश्री खैरमोडे, तनिषा बोरमानिकर, ग्रीष्मा धुमाळ, सानिया तडवी, सिया कुलकर्णी, वैभवी देवळेकर, प्रेरणा पवार, संस्कृती वानखेडे, मृण्मयी गोटमारे, अनया रॉय, निधी पुजारी, वेदांती इंगळे, रिद्धी उपासे, श्रेया हिप्परागी.
———————————————–
![]() | ReplyForward |